भिवंडी न्यायालयांत राहुल गांधीं यांच्यावरील याचिकेची १५ डिसेंबर रोजी सुनावणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2018 08:47 PM2018-09-10T20:47:32+5:302018-09-10T20:51:11+5:30
भिवंडी: भिवंडी न्यायालयांत राहुल गांधी यांच्या विरोधात दाखल याचीकेची आज सोमवारी सुनावणी होऊन याचीकाकर्त्याचा अर्ज न्यायालयाने खारीज केला. त्यामुळे याचीकेला वेगळे वळण मिळाले असून न्यायालयाने पुढील सुनावणी १५ डिसेंबर रोजी ठेवली आहे.त्या वेळी साक्षीचे जाबजबाब होणार असल्याने राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष तथा खासदार राहूल गांधी हे या सुनावणीसाठी हजर रहाण्याची दाट शक्यता आहे.
तालुक्यातील सोनाळे येथील मैदानावर झालेल्या लोकसभा निवडणूकीच्या प्रचारसभेत राहूल गांधी यांनी महात्मा गांधींजींची हत्या आरएसएसनेच घडवून आणली,असे खळबळजनक वक्तव्य केल्याचा आरोप करीत आरएसएसचे शहर जिल्हा कार्यवाह राजेश कुंटे यांनी भिवंडी न्यायालयात अवमान याचिका दाखल केली होती. या याचिके विरोधात राहुल गांधी यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेवून सदरच्या याचिकेची सुनावणी दिल्ली न्यायालयांत करण्याची विनंती केली होती. त्यावेळी राहुल गांधी यांनी उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्रासोबत भाषणातील उतारा दाखल केला होता. तो उतारा भिवंडी कोर्टात पुरावा म्हणून दाखल करून घ्यावा,असा अर्ज याचिकाकर्त्यांच्या वकीलांनी न्यायालयाकडे केला होता.परंतू मागील १२जून २०१८ रोजी भिवंडी न्यायालयासमोर झालेल्या सुनावणीच्या वेळी राहूल गांधी यांनी आपल्यावरील आरोप फेटाळले होते. तसेच राहुल गांधी यांच्या वकीलांनी ही याचिका समन्स ट्रायल प्रमाणे चालविण्याची मागणी केली तसेच उच्च न्यायालयातील कागदपत्रे भिवंडी न्यायालयांत दाखल करून घेण्यास न्यायालयास विरोध दर्शविला होता. त्यावेळी ही याचिका समन्स ट्रायल प्रमाणे चालविणयास न्यायालयाने मान्यता दिली. आज रोजी भिवंडी न्यायालयात झालेल्या युक्तीवादानंतर भिवंडी न्यायालतील मुख्य न्यायाधिश ए.ए.शेख यांनी याचिकाकर्त्यांचा अर्ज व इतर सादर केलेले पुरावे फेटाळले. तसेच याचिका कर्त्यांनी दोषारोप पत्रासोबत सादर केलेले पुरावे न्यायालसमोर सिध्द करावेत,असा युक्तीवाद राहूल गांधी यांच्या वकीलांनी केला असता तो न्यायालयाने मान्य केला. त्याचबरोबर न्यायालयाने पुढील सुनावणी १५ डिसेंबर २०१८ रोजी ठेवली आहे. ही याचिका समन्स ट्रायलने चालणार असल्याने याचिकाकर्त्यांना सबळ पुरावे न्यायालयासमोर आणावे लागणार आहे. तसेच पुढील सुनावणीत साक्ष होणार असल्याने या सुनावणीच्या वेळी राहूल गांधी न्यायालयात हजर रहाण्याची दाट शक्यता आहे. आज सुनावणी वेळी राहुल गांधी यांचे वकील नारायण अय्यर,तुषार मोर,सुदीप पाटभोर यांनी पाहिले असुन त्यांनी ही माहिती दिली.