नवी मुंबई : हृदयाच्या पुणे-मुंबई प्रवासाची घटना ताजी असताना शुक्रवारी पुन्हा एका हृदयाचा वाशी ते मुलुंडपर्यंतचा प्रवास यशस्वी झाला. वाहतूक पोलिसांनी ग्रीन कॉरिडॉरचा वापर केल्यामुळे १९ किमीचा प्रवास फक्त १४ मिनिटांत पूर्ण करण्यात आला.नवी मुंबई पोलीस नियंत्रण कक्षामध्ये पहाटे साडेसहाच्या दरम्यान फोन आला. वाशीतील एमजीएम रुग्णालयातून एक हृदय १० वाजेच्या दरम्यान मुलुंडमधील फोर्टिस रुग्णालयात घेऊन जायचे आहे. रुग्णवाहिकेला अडथळा होऊ नये यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले. काही क्षणांत पोलीस यंत्रणा वेगाने कामाला लागली. वाहतूक पोलीस उपायुक्त अरविंद साळवे यांनी तत्काळ वाशी, एपीएमसी, तुर्भे, रबाळे, महापे व सीवूड वाहतूक पोलीस चौकीच्या प्रमुखांना संदेश पाठविला. जवळपास ७० वाहतूक पोलीस, चार अधिकारी यांनी ग्रीन कॉरिडॉर करण्याचे नियोजन केले. वाशी एमजीएम, अरेंजा सर्कल, महापे पूल, ठाणे-बेलापूर रोड ते ऐरोलीमार्गे मुलुंडपर्यंत रुग्णवाहिका घेऊन जाण्याचे निश्चित करण्यात आले.वाशीवरून सकाळी १०.२६ ला हृदयाचा प्रवास सुरू झाला. सकाळी सर्वाधिक वाहतूक असणाऱ्या मार्गावरून रुग्णवाहिका घेऊन जायचे होते. कुठेही अडथळा येऊ नये यासाठी प्रत्येक चौक, जोडरस्ता, उड्डाणपुलाजवळ पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले. रुग्णवाहिकेच्या प्रवासादरम्यान इतर वाहतूक काही वेळ थांबविण्यात आली. वाशी वाहतूक पोलीस चौकीचे पोलीस निरीक्षक शिरीष पवार यांनी पायलट व्हॅनचे सारथ्य केले. नवी मुंबई पोलीस आयुक्तालयामधील १७ व मुुंबई आयुक्तालय हद्दीतील दोन असा १९ किमीचा प्रवास फक्त १४ मिनिटांत पूर्ण करण्यात आला. हृदयाचा प्रवास सुखरूप होताच पोलिसांनीही सुटकेचा श्वास सोडला. (प्रतिनिधी)
हृदयाचा वाशी-मुलुंड यशस्वी प्रवास
By admin | Published: August 07, 2015 11:03 PM