डोंबिवली : येथील पुर्वेकडील सागर्ली परिसरातील एका सात मजली बांधकामाच्या ठिकाणी लिफ्टसाठी खोदलेल्या खड्डयातील साचलेल्या पाण्यात बुडून वेदांत जाधव या सहा वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना मंगळवारी दुपारी २ च्या सुमारास उघडकीस आली. वेदांत हा खेळण्यासाठी सकाळी 10.30 वाजता घराबाहेर पडला होता. खेळताना चेंडू त्या खड्डयात पडला आणि तो काढताना पाण्यात बुडून वेदांतचा मृत्यू झाला असावा असा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे. ज्या बांधकामाच्या ठिकाणी ही घटना घडली ते अनधिकृत होते अशीही माहीती मिळत आहे. दरम्यान या घटनेची मानपाडा पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
डोंबिवली सागर्ली येथील नरेश स्मृती बंगला शेजारील विघ्नहर्ता इमारतीच्या तळमजल्यावर वेदांत हा वडील हनुमंत आणि आजी आजोबांबरोबर राहत होता. याच इमारतीच्या समोर तळमजला अधिक सात मजली इमारतीचे बांधकाम सुरू होते. त्या इमारतीच्या तळाला लिफ्टसाठी खड्डा खोदण्यात आला होता. सुमारे आठ फुट खोलीच्या खड्डयात पाणी साचले होते. दरम्यान सकाळी खेळण्यासाठी बाहेर पडलेला वेदांत बेपत्ता झाला. त्याचा आजुबाजुला शोध घेतला असता दुपारी अडीचच्या सुमारास वेदांतचा मृतदेह खड्डयातील पाण्यात तरंगत्या अवस्थेत आढळुन आला. पाण्यात हिरव्या रंगाचा चेंडू तरंगताना दिसून आला. संबंधित इमारतीचे बांधकाम २०१२ पासून सुरू होते. सुरक्षिततेची कोणतीही खबरदारी घेतलेली नव्हती. तसेच हे बांधकाम अधिकृत होते का? अशीही चर्चा सुरू झाली असून संबंधित विकासकावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी होत आहे.
वेदांतचा शेजा-यांना लळावेदांतचे वडील हनुमंत हे खाजगी कंपनीत सफाई कामगार म्हणून काम करतात. तो वडील आणि आजी आजोबांसोबत रहायचा. वेदांतचा लळा घरातल्या व्यक्तींसह शेजारी राहणा-यांनाही लागला होता. वेदांतवर त्यांचा अत्यंत जीव होता. त्याचे लाड पुरवणो, त्याच्याबरोबर खेळणो, गाडीवर फिरायला घेऊन जाणो या सर्व गोष्टी त्यांच्याकडून केल्या जात होत्या. बेपत्ता वेदांतचा मृतदेह आढळुन येताच घरातील व्यक्तींसह शेजा-यांनी फोडलेला टाहो पाहून उपस्थितांचेही डोळे पाणावले.