अंबरनाथ - अंबरनाथमध्ये एका बिस्किट कंपनीत तीन वर्षीय मुलाचा मशिनमध्ये अडकून मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी घडली. आयुष चौहान, असे त्याचे नाव आहे. घरी सांभाळ करण्यास कुणीही नसल्याने तो कंपनीत कामाला असलेली आई पूजा चौहान हिच्यासोबत आला होता.
अंबरनाथ एमआयडीसीत राधेकृष्ण बेकर्स नावाची बिस्किट कंपनी आहे. तेथे पूजा ही बिहारमधून काही दिवसांपूर्वीच काम करण्यासाठी आली होती. तिचा तीन वर्षांचा मुलगा आयुष याचा सांभाळ करणारे इतर कुणी नसल्याने ती कामावर येताना मुलालाही सोबत घेऊन येत होती. मंगळवारी सकाळी साडेआठ वाजता पूजा कंपनीत काम करताना, आयुष बिस्किट तयार करणाऱ्या मशिनजवळ गेला आणि बेल्टमध्ये अडकला. यात त्याचा मृत्यू झाला.
आयुषचा मृतदेह उल्हासनगरच्या शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आला. घटनेची माहिती शिवाजीनगर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन घेतली.