नितीन पंडितभिवंडी : कोरोनामुळे अनेकांचा रोजगार गेला. आर्थिक परिस्थिती बिकट झाली. वडील अपंग असल्याने लॉकडाऊनकाळात घरातील आर्थिक परिस्थिती बेताची झाल्याने तीन सख्ख्या बहिणी घर सोडून चक्क भीक मागत असल्याची धक्कादायक घटना भिवंडीत समोर आली आहे. या तिघी मुली अल्पवयीन असल्याने मुलींच्या आईने स्थानिक पोलीस ठाण्यात मुली बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी या मुलींचा शोध घेतला असता ही माहिती समोर आली आहे .
गरिबी व दारिद्र्यामुळे घरातून निघून जाऊन भीक मागत फिरत असणाऱ्या तीन अल्पवयीन मुलींचा शहर पोलिसांनी शोध घेत गुन्ह्याची यशस्वी उकल केली. भिवंडीतील नवीवस्ती पाइपलाइन येथील तीन अल्पवयीन मुली हरवल्याबाबत आईने शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. मुली अल्पवयीन असल्याने पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता. गुन्ह्याचे गांभीर्य पाहता पोलीस उपायुक्त राजकुमार शिंदे, सहायक पोलीस आयुक्त किसन गावित, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुभाष कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू होता. दोन पथके तयार करून मुलींचा शोध सुरू केला असता महिला पोलीस कर्मचाऱ्यांना ठाणे रोड येथील मशिदीजवळ १० वयाची चिमुरडी भीक मागताना आढळली. तिची चौकशी केली असता एकूणच प्रकार समजला. तिच्या दोन बहिणींबाबत विचारपूस केली असता, ती त्यांच्याकडे पोलिसांना घेऊन गेली.
पालकांच्या केले स्वाधीन -तिन्ही बहिणी समरू बाग तलाव परिसरात भीक मागत होत्या. या तिघींची पोलिसांनी विचारपूस केली असता, वडील अपंग असल्याने व दारिद्र्याला वैतागून आपण स्वतःहून भीक मागण्याच्या उद्देशाने घर सोडल्याचे सांगितले. गुरुवारी शहर पोलिसांनी या तिन्ही अल्पवयीन मुलींना त्यांच्या पालकांच्या स्वाधीन केले.