लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : राखी पौर्णिमेच्या पूर्वसंध्येला ठाण्यातील प्रादेशिक मनोरुग्णालयात महिला-पुरुष रुग्णांनी रक्षाबंधनाचा सण साजरा केला. या वेळी महिला रुग्णांनी ‘विठाई’ संस्थेच्या सदस्यांना राखी बांधल्यानंतर दिलेली मिठाई स्वत: न खाता ‘आधी तुम्ही खा’ म्हणत भावाला मान देणे, कपाळावर टिळा लावण्याचा, ओवाळण्याचा आनंद अनुभवला आणि भेटायला न आलेल्या भावाच्या आठवणींत अनेकींच्या डोळ्यांचा अश्रूंनी ताबा घेतला.आपल्या बहीणभावाला भेटण्यासाठी आतुर झालेल्या महिला-पुरुष मनोरुग्णांनी या सणाचा आनंद विठाई प्रतिष्ठानसोबत साजरा केला. ‘विठाई’चे अध्यक्ष अभिजित चव्हाण यांच्या पुढाकाराने दरवर्षी हा उपक्र म राबवला जातो. यंदाचे संस्थेचे १३ वे वर्ष होते. सुरुवातीला मनोरुग्णांचा सांस्कृतिक कार्यक्रम पार पडला. यात कोणी गाणे गायले, तर कोणी नृत्य सादर केले. या वेळी महिला मनोरुग्णांनी प्रतिष्ठानच्या पुरुष पदाधिकारी, सदस्यांना तर प्रतिष्ठानच्या महिला सदस्यांनी पुरुष मनोरुग्णांना राखी बांधली.आमचा भाऊ असूनही इथे येत नाही, मग यांनाच आम्ही राखी बांधतो. हेच आमचे भाऊ. आमच्यासाठी दरवर्षी हा कार्यक्रम आयोजित करतात. त्यामुळे खूप छान वाटतं, अशा भावना एका महिलेने व्यक्त केल्या.घरचे कोणी येत नाही, माझी बहीणही नाही, असे राखी बांधून घेताना भावुक होऊन एक पुरुष मनोरुग्ण प्रतिष्ठानच्या महिला सदस्यांना सांगत होता. या वेळी ते बहीण म्हणून त्यांच्या पायादेखील पडले. या मनोरुग्णांना संस्थेतर्फे मिठाईचे वाटप केले. एका ५५ वर्षांच्या महिलेने प्रतिष्ठानच्या सदस्याला राखी बांधल्यानंतर त्यांना मिठाई दिली. त्या वेळी ती मिठाई स्वत: न खाता ‘आधी तुम्ही खा’ असे म्हणत त्या सदस्याला खाऊ घातली. कपाळावर टिळा लावताना, ओवाळणी करताना आणि राखी बांधताना या महिलांच्या चेहºयावर विलक्षण आनंद होता.भविष्यात येणाºया सणाच्या दिवशी सगळेच जण घरी असाल, अशी भावना चव्हाण यांनी या वेळी व्यक्त केली.तुम्ही बरे होऊन घरी गेलात, तरी आम्ही तुमच्या घरी येऊन राखी बांधून घेऊ, असे प्रतिष्ठानचे सदस्य रत्नदीप पटेल म्हणाले. संस्थेचे विक्रांत महाडिक यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.या वेळी मनोरुग्णालयाच्या परिचारिका छाया घोलप, स्मिता चव्हाण, प्रतिष्ठानचे तुषार सावंत, भूषण शेलार, शरद बिराजदार व इतर उपस्थित होते.
मनोरुग्णालयात ओलावल्या कडा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 07, 2017 6:31 AM