टिटवाळा : कल्याण तालुका पोलीस ठाण्यांतर्गत सार्वजनिक ३० व खाजगी १२३१ बाप्पा व २२ गौरी बसविण्यात आल्या होत्या. मंगळवारी जड अंतःकरणाने पाच दिवसांच्या बाप्पांना गौरीसोबत भावपूर्ण निरोप देण्यात आला. ‘गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या...’च्या गजराने संपूर्ण परिसर दणाणून निघाला हाेता. मात्र, विसर्जन साेहळ्यादरम्यान पावसाने हजेरी लावल्याने गणेशभक्तांची तारांबळ उडाली.
गौराईसोबत पाच दिवसांच्या बाप्पांच्या मोठ्या आनंदी व उत्साही वातावरण विसर्जन मिरवणुका काढण्यात आल्या. सार्वजनिक मंडळे व खाजगी गणपती विसर्जनासाठी भाविक भक्तांकडून जय्यत तयारी करण्यात आली होती. दोन दिवसांपासून सततधार कोसळणाऱ्या पावसामुळे बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीवर विरजण पडले. जागोजागी ढोल-ताशांच्या गजरात मिरवणुकी काढण्यात आल्या. फळेगाव येथील घरगुती सर्व गणपती विसर्जन मिरवणूक सार्वजनिक पद्धतीने सालाबादप्रमाणे यंदाही काढण्यात आली. या विसर्जन मिरवणुकीत लहान थोरांसह महिलाही सहभागी झाल्या होत्या. विसर्जन मिरवणुकीत कुठल्याही प्रकारचा कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याकरिता कल्याण तालुका पोलीस ठाण्याच्या वतीने चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. टिटवाळा हनुमान मंदिर तलाव, वरप तलाव, पाचवा मैल घाट, रायते नदीवरील पूल, रुंदे काळू नदी पूल, टिटवाळा व वासुंद्री काळू नदी घाट, गाळेगाव उल्हासनदी घाट, खडवली भातसा नदी आदी ठिकाणी गणपती बाप्पांचे विसर्जन करण्यात आहे. या ठिकाणी सात अधिकारी ८० कर्मचारी, असा भला मोठा फौज फाटा विसर्जन काळात तैनात करण्यात आला असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू वंजारी यांनी सांगितले.