अजित मांडके /पंकज पाटील / ठाणे/उल्हासनगरठाण्यासह उल्हासनगरमध्ये निवडणुकांच्या प्रचारासाठी उमेदवारांची चांगलीच कसरत होत आहे. आता पॅनल पद्धत असल्याने उमेदवारांना मोठा प्रभाग पिंजून काढावा लागत आहे. त्यात, गेल्या तीनचार दिवसांपासून उन्हाचा पारा ३७ अंशाच्यावर पोचल्याने त्याचा परिणाम उमेदवारांच्या प्रचारावर होत आहे. सकाळी दोन तास आणि थेट सायंकाळी ५ नंतरच उमेदवारांना प्रचारासाठी बाहेर पडावे लागत आहे. त्यामुळे कमी वेळेत जास्तीतजास्त प्रचार, हे गणित सोडवणे अवघड जात आहे. उन्हात फिरण्यास कार्यकर्ते तयार नसल्याने उमेदवार कासावीस झाले आहेत. तापलेल्या वातावरणात काम करताना निवडणूक कर्मचाऱ्यांनाही चांगलाच घाम फुटला आहे. प्रचाराचा जोर आणि उन्हाचा पारा, यामध्ये वाढ झालेली असली तरी वेळेचे नियोजन करण्यात अनेक अडचणी येत आहेत. दिवसभर प्रचाराची मुदत असली तरी प्रत्यक्षात उमेदवारांना केवळ ६ तासच प्रचारासाठी मिळत आहेत. सकाळी १०.३० ते १२.३० या वेळेतच ते प्रचारासाठी बाहेर पडत आहेत. त्यानंतर, उन्हाचा तडाखा वाढत असल्याने कार्यकर्ते फिरण्यास तयार होत नाहीत. मतदारही दुपारच्या वेळेत प्रतिसाद देत नसल्याने इच्छा असतानाही उमेदवारांना प्रचारासाठी जाता येत नाही. त्यामुळे प्रचाराची खरी कसरत सायंकाळी ५ ते रात्री ९ या वेळेतच दिसत आहे. सायंकाळच्या ४ तासांतच संपूर्ण प्रभाग पिंजून काढण्यावर उमेदवारांनी भर दिला आहे. उमेदवारांच्या प्रत्यक्ष भेटीगाठी आणि प्रचारपत्रके वाटण्यासाठी उमेदवारांना हीच वेळ योग्य आहे. तर, दुपारचे ४ तास इतर नियोजनात घालवण्याची वेळ आली आहे. उन्हाचा पारा वाढल्याने कोणीच बाहेर पडण्यास तयार होत नसल्याने ही वेळ कार्यकर्त्यांच्या आरामाची वेळ झाली आहे. मात्र, सायंकाळच्या ४ तासांत न थांबता आणि न थकता कार्यकर्त्यांना प्रचारात सहभागी व्हावे लागत आहे. मतदारांच्या प्रत्यक्ष भेटी घेण्यावरच त्यांनी भर दिला आहे. त्यातच, सर्वच पक्षाच्या नेत्यांनी उल्हासनगरकडे पाठ फिरवल्याने तेथील उमेदवारांनी चौक सभा आणि प्रत्यक्ष भेटी यावरच भर दिला आहे. दरम्यान, चार उमेदवार एका पॅनलमध्ये असल्याने एकत्रित प्रचारापेक्षा ठाण्यासह उल्हासनगरच्या काही उमेदवारांनी वैयक्तिक प्रचारावर भर दिला आहे. संपूर्ण प्रभागात एकदा तरी मतदारांना भेटता यावे, हे लक्ष ठेवून उमेदवार आपल्या प्रचाराचे नियोजन करत आहेत. त्यातच, मतदानाच्या दोन दिवस आधीच प्रचार बंद होत असल्याने उमेदवारांना कमी वेळेत जास्तीतजास्त प्रचार करण्यावर भर देण्याची वेळ आली आहे.
निवडणूक प्रचाराला उन्हाचा तडाखा
By admin | Published: February 17, 2017 2:11 AM