ठाणे : ठाण्यात एप्रिल महिन्यात तब्बल २२ दुर्मीळ पक्षी हिटस्ट्रोकने (उन्हाचा तडाखा) जखमी झाले. ठाण्यातील ब्रह्मांड येथील एसपीसीए या पशुपक्ष्यांच्या रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असून, लवकरच त्यांना मुक्तसंचारासाठी जंगल परिसरात सोडण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. गतवर्षीच्या तुलनेत यंदा हिटस्ट्रोकने पक्षी जखमी होण्याचे प्रमाण कमी असल्याचे तज्ज्ञ डॉक्टरांनी सांगितले.
पावसाळ्यात झाडांच्या फांद्या कापल्याने पक्ष्यांची घरटी नष्ट होतात. त्यामुळे पावसाच्या पाण्यात भिजून गारठल्याने अनेक पक्ष्यांना कुलस्ट्रोक (थंडीचा तडाखा) होतो. याउलट वाढत्या उन्हाने आणि पाण्याच्या कमतरतेमुळे पक्ष्यांना हिटस्ट्रोक होतो. त्यामुळे ते जखमी होतात. अशाप्रकारे ठाण्यातील घोडबंदर रोड, येऊर तसेच डोंबिवली, मुलुंड, भांडूप आदी आजूबाजूच्या परिसरातून जखमी पक्ष्यांना रुग्णालयात दाखल केले आहे.
१४ घारी आणि प्रत्येकी चार घुबड आणि ससाणे अशा एकूण २२ पक्ष्यांना हिटस्ट्रोक झाल्याने ते जखमी झाले आहेत. या पक्ष्यांना जीवदान देण्यात डॉक्टरांना यश आले असून, लवकरच त्यांना ज्या-ज्या परिसरातून आणले आहे, त्या-त्या परिसरात किंंवा जंगलात सोडले जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.हिटस्ट्रोकमुळे पक्ष्यांच्या शरीरातील पाणी कमी होते. त्यामुळे त्यांना उन्हाचा फटका बसतो. त्यांची प्रकृती आता सुधारत आहे. यंदा हिटस्ट्रोकने पक्षी जखमी होण्याचे प्रमाण गतवर्षीपेक्षा कमी आहे. - डॉ. सुहास राणे, वैद्यकीय अधिकारी