अनिरुद्ध पाटील
बोर्डी: हवामान विभागाने 31 ऑगस्ट रोजी पालघर जिल्ह्यासाठी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवून यलो अलर्ट दिला होता. त्याप्रमाणे डहाणूत रात्रीपासून पावसाचा तडाखा बसत असून मुसळधार पावसासह ढगांचा गडगडाट व विजांचा कडकडाट मंगळवारी सकाळी दहा वाजेपर्यंत सुरू आहे.
यामुळे डहाणू तालुक्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे. अनेक ठिकाणी सखल भागात पाणी पातळी वाढू लागली आहे. ग्रामीण भागात घरांमध्ये आणि शहरी भागातील गृहासंकुलकात पुराचे पाणी घुसण्यास सुरुवात झाली आहे. डहाणू शहरातील मुख्य रस्त्यांसह, डहाणू बोर्डी प्रमुख राज्य मार्गारून अनेक ठिकाणी पुराचे पाणी वाहू लागले आहे. नदी, नाले तुडुंब भरले असून अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. घोलवड पोलिसांकडून नागरिकांना मदत पुरवण्यात येत आहे.