उमेश जाधव
टिटवाळा - अवकाळी पावसाने ठाणे जिल्ह्यातील ३१ हजार हेक्टर भात शेतीचे नुकसान केले आहे. यात कल्याण तालुक्यातील अंदाजे ३५७८ इतक्या भातशेतीचे नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील या नुकसान ग्रस्त भातशेती पैकी १७ हजार हेकटर भात शेतीचे पंचनामे आद्यप पर्यंत झाले आहेत. यात कल्याण तालुक्यातील अंदाजे १०९४.६४ हेक्टर पंचनामे झाले असून, उर्वरीत शेतीचे पंचनामे लवकर पूर्ण केले जातील अशी माहिती जिल्हा कृषी अधिकारी अंकुश माने यांनी दिली.
ठाणे जिल्ह्यातील ५६ हजार हेकटर जमिनीत पावसाळ्यात खरीप हंगामात भाताचे पीक घेतले जाते. यात यंदा कल्याण तालुक्याच्या ग्रामीण भागातील ६८ गाव पाड्यातील ५२९० हेक्टर क्षेत्रावर भातच पिक घेतले आहे. परंतू यावर्षी परतीच्या पावसाने धुमाकूळ घातल्याने हळवी, निम गरवी व गरवी भात पिके घेतली गेली आहेत. यंदा भात शेतीला योग्य असा पाऊस पडल्याने भाताचे पीक उत्तम दर्जाचे आले होते. मात्र हे पीक शेतातून शेतकऱ्यांच्या घरात येईपर्यंत परतीच्या पावसाने या भात पिकांची पुरती नासाडी केली आहे.
यंदा ना भात पिक, ना तांदूळ, ना तनस
ठाणे जिल्हा भाताचे कोठार म्हणून प्रसिद्ध आहे. यावर्षी मात्र याच कोठाराला परतीच्या पावसाची दृष्ट लागली आहे. या कल्याण तालुक्यातील शेकडो हेक्टर भाताची कापणी केलेली पिके भिजल्याने शेतकऱ्यांना ना तांदूळ, ना तनस हाती लागणार आहे. यावर्षी भात पिकाच्या नासाडीचा फटका जनावरांच्या चाऱ्याला देखील बसणार आहे. तसेच भिजलेली भात पिकातील तांदूळ पूर्ण पणे न निघता त्याचे तुकडे पडणार आहेत. त्यामुळे असे पीक ना खावटीस ना बाजारात विक्रीसाठी उपयोगी पडणार आहे. यामुळे खर्च झालेली मजुरी, वर्ष भराची मेहनत ही परतीच्या पावसाने अक्षरशः शेतकरी राजाकडून ओरबाडून नेली आहे. पुढे वर्षभर खायच काय हा प्रश्न शेतकरी बांधवांना पडला आहे. भात पिकाशी संबंधित तूस, पेंढा, यांच्या टंचाईमुळे महागाई वाढेल अशी भीती शेतकरी वर्ग व्यक्त करत आहे. यामुळे कल्याण तालुक्याच्या ग्रामीण भागातील बळीराजा कमालीचा हवालदिल झाला आहे. प्रशासनाने योग्य पंचनामे करून एक ही बाधीत शेतकरी सुटू नये अशी मागणी तालुक्यातील शेतकरी वर्गातून केली जात आहे.
ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी ६ नोव्हेंबर रोजी जिल्ह्यातील पाच तालुक्यातील भात शेतीच्या नुकसानाची पाहणी केली. एक ही शेतकरी नुकसान भरपाई विना सुटणार नाही. सर्व बाधीत शेतकऱ्यांना नुकसानभरपाई दिली जाईल असे शिंदे यांनी सांगितले. नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना न्याय मिळावा हीच आमची अपेक्षा आहे.
राजेंद्र बांगर, शेतकरी, फळेगाव
अवकाळी पावसामुळे कल्याण तालुक्यातील हजारो हेक्टर भात शेतीचे नुकसान झाले आहे. शेतीचे योग्य प्रकारे पंचनामे करावेत. यात राजकारण आणू नये. शेतकरी हवालदिल झाला आहे. त्याला लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळावी.
अशोक भोईर, आधार शेतकरी संघटना, अध्यक्ष
सध्या तालुक्यातील बहुतांश बाधित भात शेतीचे पंचनामे महसूल विभागाकडून झाले आहेत. लवकरच उर्वरित शेतीचे पंचनामे होतील. तसेच विमा कंपन्या देखील पंचनामे करत आहेत.
दीपक आकडे, तहसीलदार