ठाणे : हवामान खात्याने एकीकडे अतिवृष्टीचा इशारा दिल्याप्रमाणे ठाणे शहरात पावसाने दुपारच्या सुमारास धुवांधार बॅटिंग करण्यास सुरू केली. अवघ्या चार तासात पावसाने धू धु धुवत ७७.२२ मिमीची नोंद केल्याने शहरातील ९ ठिकाणी पाणी साचले होते. त्या ठिकाणी पंप लावून पाण्याच्या निचऱ्याचे काम जोरात सुरू होते. मात्र पावसाचा जोर कायम असल्याचे पाहण्यास मिळत होता. याचदरम्यान शहरात दोन ठिकाणी दोघे जण पाण्यात बुडाले असून एकाचा मृतदेह सापडला असून दुसरा अद्यापही बेपत्ता आहे.
गेल्या काही दिवसांपासून ठाणे जिल्ह्यातील ग्रामीणच नाहीतर शहरी भागात ही पाऊस उघडीप घेताना दिसून आला नाही. त्यातच हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. गेल्या चोवीस तासात म्हणजे बुधवारी सकाळी साडेआठ ते गुरुवारी सकाळी साडेआठ वाजेपर्यंत शहरात ९४.१६ मिमी पाऊस झाला आहे. दरम्यान ठामपा आपत्ती व्यवस्थापन कक्षात एकूण २५ तक्रारी नोंदवल्या गेल्या आहेत. यामध्ये ७ ठिकाणी झाडे उन्मळून तर ५ ठिकाणी झाडांच्या फांद्या तुटून पडल्या आहेत. दोन ठिकणी आग लागली असून दोन ठिकाणी झाडे धोकादायक स्थितीत असल्याची तक्रार आहे. याशिवाय ९ अन्य तक्रारी आहेत.
गुरुवारी सकाळपासून पाऊस सुरू आहे. सकाळी साडेआठ ते दुपारी साडेतीन वाजेपर्यंत म्हणजे या आठ तासात ८८. ८८ मिमी पाऊस नोंदवला गेला आहे. त्यामध्ये दुपारी दीड ते साडेचार या चार तासात अक्षरशः पावसाचा जोर वाढला, याच कालावधीत ७७.२२ मिमी पाऊस झाला आणि त्याच्यानंतर ही त्याचा जोर कायम सुरूच होता. त्यातच दीड ते अडीच या एक तासात तब्बल २४.८९ मिमी तर साडेतीन ते साडेचार या एक तासात २३.८८ मिमी पाऊस नोंदवला गेला. यामुळे शहरातील ९ ठिकाणी पाणी साचले होते. तर रायगड आळीत अंदाजे ३५ फूट लांब आणि ०८ फूट उंच अशी गौरीनंदन सोसायटीची संरक्षण भिंत पडली असून शिवाईनगर येथे झाडाची फांदी तुटून पडली आहे. त्यातच दोन ठिकाणी पाण्याचा अंदाज न आल्याने दोघे बुडाले असून एकाचा मृतदेह सापडला असून दुसरा अद्यापही बेपत्ता आहे. त्याच्या शोधकार्यात वाढत्या पाण्याचा प्रवाह प्रामुख्याने आढळल्याचे सांगण्यात येत आहे.
या ठिकाणी साचले पाणी; आठ ठिकाणी लावले पंप
कापूरबावडी, विटावा रेल्वे पुलाखाली, नौपाडा- चिखलवाडी, वंदना बस डेपो,भास्कर कॉलनी,पेढ्या मारुती मंदिरासमोर, ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कार्यालयाच्या आवारात, खान चाळ आणि बाबूभाई पेट्रोलपंप या ठिकाणी पाणी साचले होते. यामधील कापूरबावडी सोडले तर अन्य ठिकाणी डी वॉटरिंग पंप लावून पाण्याचा निचरा करण्यास सुरू केली होती.