लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: जिल्ह्यात संततधार सुरू असलेल्या पावसामुळे भिवंडी, मुरबाड, शहापूर या तालुक्यांतील गावांमधील तब्बल २६ घरे पडली आहेत. यामध्ये २३ घरे पक्की असून तीन घरे पक्की आहेत. तर दोन गाईगुरांचे गोठे आहेत.
जिल्ह्यात कालपासून जोरदार पाऊस पडत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व महामार्गांवर वाहतूक कोंडीने नागरिक हैराण आहे. तर ठाणे उपनगरीय प्रवास वाहतुकीचे वेळापत्रक कोलमडल्याने चाकरमान्यांचे हाल होत आहेत. शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनाही वाहतूक कोंडीचा फटका बसत आहे. ठाण्याचा घोडबंदर रोड, मुंबई-नाशिक महामार्ग, एक्स्प्रेस वेळ आली महामार्गांवर तासनतास वाहतूक खोळंबली आहे. जिल्ह्यात गेल्या २४ तासात सरासरी ७३.९ मिमी. पाऊस पडला. सर्वाधिक पाऊस भिवंडी तालुक्यात सरासरी ९२.३ मिमी. पडल्याची नोंद सकाळी घेण्यात आली आहे.
जिल्ह्यातील सर्व नद्यांपैक टिटवाळा येथून वाहत जाणारी काळू नदी लवकरच इशारा व धोक्याची पातळी ओलांडण्याची स्थिती आहे. जिल्ह्यातील पाणी पुरवठा करणारे धरणे आधीच भरलेली असल्यामुळे दरवाजे उघडून त्यातील पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. जिल्ह्यात खाड्यांना सकाळी ५ वाजता भरती आली आहे. तर सायंकाळी ४.४९ वा. ही भरती पुन्हा येणार आहे. या दरम्यान ३.६८ मीटर लाटा उसळण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. मुरबाड तालुक्यातील पवाळे, तळेगाव तर भिवंडीतील वेव्हळ येथील पक्के घरे पडली. तर शहापूर तालुक्यात १९ घरे पडली असून त्यात सायगाव, खूटळ, लाखेवाडी, खरीवली, चेरपोली, साईनगर येथील घरांचा समावेश आहे.