ठाणे: गेल्या काही दिवसांपासून दडी मारून बसलेल्या पावसाने आता प्रारंभ केला आहे. दिवसभर कमी अधीक पडलेल्या या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून उपनगरीय गाड्यांची वाहतूकही काही अंशी काेलमडली. त्यामुळे प्रवाश्यांचे हाल झाले. दरम्यान ग्रामीण व दुर्गम गांवखेड्यात गेल्या २४ तासात ३२५.१ मिमी पाऊस पडला असून सरासरी ४७.३ मिमी पाऊस पडल्याची नोंद प्रशासनाने घेतली आहे. ठाणे शहरात आग लागण्याच्या एका किरकोळ घटनेसह एक झाड फोरव्हीलर गाडीवर पडून नुकसान झाले. यासह ठिकठिकाणी दहा झाडे पडल्याच्या घटना घडल्या. तर शहरात आठ ठिकाणी पाणी तुंबल्याच्या घटनेसह अन्य किरकोळ १३ घटनां घडल्या. महापालिका क्षेत्रता ५९ मिमी पाऊस पडल्याची नोंद ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन कक्षाने घेतली.
जिल्ह्यातील ग्रामीण भागात आज एकूण ३२५ मिमी पाऊस पडल्याची नोंद आहे. यामध्ये ठाणे तालुक्यात ५०६ मिमी,कल्याणला ५३.२, मुरबाडला ३८.६, भिवंडीला ६२.४,शहापूरला १४.८, उल्हासनगला ३९.५ आणि अंबरनाथला ६६ मिमी पावसाची नोंद करण्यात आली. या दरम्यान ग्रामीण भागात कोणतीही अनुचित घटना घडली नसल्याचे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाने सांगितले. तर ठाणे शहर परिसरात एकूण १३७.७६ मिमी पाऊस पडला असून महापालिकेने सरासरी ५८.९० मिमी पाऊस पडल्याची नोंद घेतली आहे.
या पावसा दरम्यान ठाणे शहरातील ठिकठिकाणच्या रस्त्यांवर आठ ठिकाणी पाणी तुंबल्याची नोंद घेण्यात आली. तर एका घटनेत पाण्याची लाइन लिकेज झाली आहे. झाडे उन्मळून पडल्याच्या दहा घटना घडल्या असून दोन झाडे धोकादायक स्थितीत आढळून आली आहे. तर सहा झाडांच्या फांद्या रस्त्यावर लोंबकळल्या असता अग्नीशमन दलाच्या जवानांनी त्यांच्यासह पडलेल्या झाडांना वेळीच रस्त्याच्या बाजूला कडून त्यांची कापणी केली आहे. त्यामुळे शहरातील वाहतूक कोंडी टाळणे शक्य झाले आहे. ओवळा अग्निशमन केंद्राच्या जवानांनी तुर्फेपाडा, हिरानंदानी इस्टेट या ठिकाणच्या रस्त्यावर पडलेले झाड वेळीच बाजूला केले.
महावितरणच्या विद्युत डीपीमधील केबलला अय्यप्पा मंदिर जवळ, एकमानास सोसायटीच्या बाजूला, श्रीनगर, वागळे इस्टेट येथे किरकोळ आग लागली होती. दरम्यान विद्युत पुरवठा खंडीत केल्यानंतर आग विझवण्यात आली. कासारवडवली नाका, घोडबंदर रस्त्यावरती झाड पडले होते. तर ठाण्याहून घोडबंदर रोडला जाताना मानपाडा ब्रिजच्या उजव्या बाजूलारस्ता खड्यामुळे पूर्ण खराब झालेला आहे. त्यामुळे वाहतुकीला आडथळा निर्माण होत असे. पोखरण रोड, वसंत विहार या ठिकाणी टूलिप सोसायटीच्या आवारात पार्क केलेल्या राहुल तुलसीदास राणे चारचाकी वाहनावर झाड पडले. याच रोडवरील हनुमान मंदिर जवळ, बेथनी हॉस्पिटल समोर झाड पडले. जिल्हाधिकारी कार्यालय, कोर्टनाकाजवळील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या चाळीतील घरावर झाड पडल्याची नोंद घेण्यात आली आहे. या घटनेत कोणालाही दुखापत नसून ठाणे आपत्ती प्रतिसाद दलाच्या जवानांनी हे झाड कापून बाजूला केले आहे.