लाेकमत न्यूज नेटवर्क, ठाणे :ठाणे जिल्ह्यात गुरुवारी दिवसभरात १३८ मि.मी. पाऊस पडला. अनेक वस्त्यांमध्ये पाणी शिरल्याने एक हजार ४०८ नागरिकांचे स्थलांतर केले. मुंबई, ठाणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांच्या पाणीसाठ्यात माेठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. तानसा धरणापाठाेपाठ गुरुवारी माेडकसागर धरण भरल्याने दाेन दरवाजे उघडले. भातसा धरणातील पाण्याचा काेणत्याही क्षणी विसर्ग होण्याची शक्यता आहे. त्यामुळे धरणांखालील गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
धरणातील पाणीसाठा
भातसा धरणात सध्या ७२.६७ टक्के पाणीसाठा आहे. खबरदारीची उपाययाेजना म्हणून धरणातील पाण्याचा विसर्ग करावा लागणार आहे. माेडकसागर भरल्यामुळे दाेन दरवाजे उघडले. याप्रमाणेच आंध्रा धरणात ५६.८२ टक्के पाणीसाठा असून, आज १३४ मिमी पाऊस पडला. मध्य वैतरणात ५३.३२ टक्के पाणीसाठा असून, गुरुवारी १६५ मिमी पाऊस पडला. बारवी धरणात ७६.६२ टक्के पाणीसाठा तयार झाला. १५४ मिमी पाऊस झालेल्या बारवी धरणाच्या कान्हाेळ, ठाकूरवाडी, पाटगाव आणि कान्हवरे या पाणलाेट क्षेत्रात जाेरदार पाऊस झाला.जिल्ह्यात सरासरी १३८.१ मिमी पाऊस
जिल्ह्यात सरासरी १३८.१ मिमी. पाऊस झाला. सर्वाधिक पाऊस मुरबाडला २१२ मिमी. तर, सर्वांत कमी भिवंडीला ११२.७ मिमी पाऊस झाला. हवामान खात्याने शुक्रवारी जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट दिला आहे. पुढील तीन दिवस यलाे अलर्ट असल्यामुळे पावसाची संततधार सुरू राहील.
‘एनडीआरएफ’ तैनात
पावसामुळे जिल्ह्यातील सहा पक्क्या व कच्च्या घरांचे नुकसान झाले. कल्याण तालुक्यातील मोहने, वरप, वालधुनी, कल्याण, आणे, भिसोळ, रायते, आपटी, दहागाव, मांजर्ली ही गावे बाधित होण्याची शक्यता लक्षात घेत पाेलिसांसह ‘एनडीआरएफ’चे पथकही तैनात केले आहे.
चिखली पूल पाण्याखाली; शहापूर, मुरबाड तालुक्यांचा संपर्क तुटला
अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने ३५५ कुटुंबांमधील एक हजार ४०८ जणांना स्थलांतरित केले आहे. उल्हास नदीवरील रायते व रुंदे पूल पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे कल्याण-मुरबाड महामार्ग बंद आहे. रायते व रुंदे गावातील ९६ कुटुंबांना सुरक्षितस्थळी हलवले आहे. मुरबाड तालुक्यातील चिखली पूल पाण्याखाली गेल्यामुळे शहापूर व मुरबाड तालुक्यांचा संपर्क तुटला. घाेरला पूलही पाण्याखाली गेला आहे. खबरदारीची उपाययाेजना म्हणून कल्याण आणि अंबरनाथ येथील १०७ कुटुंबांचे स्थलांतर केले आहे. कल्याण येथील ४० कुटुंबांतील १५६ व्यक्तींनी त्यांच्या नातेवाइकांच्या घरी आसरा घेतला. अंबरनाथ येथील ६७ कुटुंबांतील २०० जणांचे बीएसयूपी इमारतीत तात्पुरते स्थलांतर केले. बदलापूरजवळील कासगाव वृद्धाश्रमातील १२ जणांना स्थलांतरित केले.