अजित मांडके, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे : मागील काही दिवसापासून अधून मधून पडणाºया रिपरिप करणाºया पावसाने रविवारी रात्री पासून ठाणे शहराला चांगलेच झोडपून काढले. रात्रीच्या सुमारास झालेल्या पावसाने ठाण्याच्या काही सखल भागात पाणी साचले होते. परंतु महापालिकेने ठिकठिकाणी लावलेल्या पंपमुळे पाणी साचून राहिले नसल्याचे दिसून आले. डोंगराची माती खचणे, वनविभागाची भिंत पडणे, रुमचे प्लास्टर पडणे आदींसह शहरात विविध ठिकाणी वृक्ष पडल्याच्या घटनाही घडल्या. सुदैवाने यात कोणत्याही प्रकारची जीवीतहानी झाली नसली तरी देखील वित्त हानी झाल्याचे दिसून आले. तर रविवारी रात्री सुरु झालेल्या पावसाने सोमवारी सकाळी ८ वाजेपर्यंत १२७.९८ मीमी पावसाची नोंद झाली. तर सोमवारी सांयकाळ पर्यंत १४.९६ मीमी पावसाची नोंद झाली.
मागील काही दिवस पावसाची अधून मधून रिपरिप सुरु होती. मात्र रविवारी रात्री पासून पावसाने ठाण्यात दमदारी हजेरी लावल्याचे दिसून आले. रात्री २.३० वाजताच्या सुमारास २९.९७ मीमी पावसाची नोंद झाली. त्यानंतर पहाटे पर्यंत पावसाचा जोर वाढल्याचे दिसून आले. पहाटे ३.३० ते ४.३० या कालावधीत पावसाने जोरदार हजेरी लावल्याचे दिसून आले. या कालावधीत ४५.९८ मीमी पावसाची नोंद झाली. त्यानंतर पावसाचा जोर मंदावल्याचे दिसून आले.
सोमवारी सकाळ पासून दुपारी ३.३० वाजेपर्यंत १४.९६ मीमी पावसाची नोंद झाली. या कालावधीत तीनहात नाका परिसरात असलेल्या वनविभागाची संरक्षक भिंत पडली. तिकडे लोकमान्य पाडा नं. ४ मध्ये डोंगरावरील माती खचली. तर वागळे इस्टेट भागात रुमचे प्लास्टर पडून एक दोन वर्षीय मुलाच्या उजव्या पायाला दुखापत झाली. शिवाय लोकमान्य नगर भागात टीएमटी बसडेपोची संरक्षक भिंत पडल्याचे दिसून आले. यात कोणत्याही प्रकारची जीवीतहानी झाली नाही. मात्र रात्री पासून पडत असलेल्या पावसाने शहरातील टेंभी नाका, आंबेडकर रोड आदींसह वंदना व इतर सखल भागात पाणी साचल्याचे दिसून आले.
तिकडे दिवा भागातही अनेक ठिकाणी पाणी साचले होते. तसेच वृक्ष उन्मळून पडण्याच्या ५, फांद्या पडल्याच्या ०२, धोकादायक स्थितीत वृक्ष असलेल्या ०२, प्लास्टर कोसळल्याची एक, डोंगरावरील माती खचल्याची एक व इतर तीन तक्रारी ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाला प्राप्त झाल्या.