अजित मांडके,ठाणे : काहीशी उघडीप घेतलेल्या पावसाने शुक्रवारी रात्री पासून पुन्हा ठाण्यात दमदार हजेरी लावली आहे. शनिवारी सकाळ पासून पावसाने आपला जोर कायम ठेवल्याचे दिसून आले. त्यामुळे शहरातील काही सखल भागात पाणी साचल्याचे दिसून आले. सकाळी ८.३० वाजेपर्यंत ६७.५४ मीमी पावसाची नोंद शहरात झाली. तर शनिवारी दुपारी २.३० वाजेपर्यंत ३५.०५ मीमी पाऊस शहरात झाला. यात काही ठिकाणी झाडांची पडझड झाल्याच्या घटना घडल्या. त्यात काही ठिकाणी वाहनांचे नुकसान झाल्याचेही दिसून आले.
मागील दोन ते तीन दिवसापासून पावसाने पुन्हा काहीशी उघडीप घेतली होती. परंतु शुक्रवारी रात्री ८ वाजल्यापासून पावसाने ठाण्यात दमदार हजेरी लावली आहे. शनिवारी दिवसभर मुसळधार पावसाच्या सरी ठाण्यात बरसत होत्या. त्यामुळे वातावरणातही काहीसा गारवा निर्माण झाला होता. सकाळी ८.३० वाजेपर्यंत ६७.५४ मीमी पावसाची नोंद ठाण्यात झाली. त्यानंतर शनिवारी सकाळी काहीसा हळूवारपणे पावसाची सुरवात झाली. त्यात अधून मधून पावसाच्या दमदार सरी बरसल्याचे दिसून आले. त्यामुळे दुपारच्या सुमारास पेढ्या मारुती मंदिर परिसरात आणि अन्य सखल भागात पाणी साचल्याचे दिसून आले.
सावरकर नगर येथील जाधव वडापाव जवळ प्लॉट क्रमांक ३३ च्या आॅफिसवर व रूम नंबर १४ याच्या दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास झाड पडले. यामुळे घरासह ऑफिसचे पत्रे फुटून नुकसान झाले असून सुदैवाने या घटनेत कोणालाही दुखापत झालेली नाही. तसेच पडलेले झाड कापून बाजूला करण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी ठामपा वृक्ष प्राधिकरण विभागाचे कर्मचारी, आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी व अग्निशमन दलाचे जवान यांनी धाव घेतली. अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांनी दिली. तर शुक्रवारी रात्री ९ च्या सुमारास दिवा आगासन रोड येथे सावित्रीबाई नगर चाळीच्या दोन घरांवर झाड पडले होते. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या कर्मचाºयांनी घटनास्थळी धाव घेतली. यात दोन घरांचे नुकसान झाले असून सुदैवाने यात कोणत्याही प्रकारची जीवीतहानी झालेली नाही.
दुसरीकडे शनिवारी दुपारी २.३० वाजेपर्यंत ३५.०५ मीमी पावसाची नोंद शहरात झाली आहे. तर महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाला दिवसभरात १० तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यात आगीची १, झाड पडल्याच्या ४, फांद्या ०१, पाणी साचल्याच्या ०२ आणि इतर दोन अशा स्वरुपाच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.
मागील वर्षी १३ जुलै रोजी पर्यंत ठाणे शहरात १००१.६० मीमी पावसाची नोंद झाली होती. परंतु यंदा पावसाने काहीशी उघडीप घेतल्याने तेवढा पाऊस होतो का नाही? याबाबत शंका उपस्थित होत होत्या. परंतु यंदा १३ जुलै रोजी ११६८.९५ मीमी पावसाची नोंद झाल्याचे दिसून आले. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा १६७.३५ मीमी अधिक पावसाची नोंद झाल्याचे दिसून आले आहे.