ठाणे : बाहेर धो धो पाऊस पडत असतांना देखील ठाणेकरांच्या घशाला मात्र कोरडच अशी स्थिती आजही कायम आहे. शहाड पंपीग स्टेशनमध्ये नदी पात्रात मोठ्या प्रमाणात गाळ, कचरा काढण्यात आल्यानंतरही ठाण्याचा पाणी पुरवठा आजही सुरळीत झाला नसल्याचेच चित्र आहे. घोडबंदरसह अनेक भागांना आजही पाण्यासाठी टँकरवर अवलंबून राहावे लागत असल्याचे चित्र आहे. मागील १० ते १२ दिवसापासून ठाणेकरांना पाणी कपातीचा सामना करावा लागत आहे. त्यात आता दुरुस्ती झाली असली तरी देखील गढूळ पाणी खेचण्यात पंपीगमध्ये अडथळे निर्माण होत आहेत, तसेच गढूळ पाणी शुद्ध केल्यानंतरही पाणी वाया जात असून सुमारे २५ दशलक्ष लिटर पाणी कमी खेचले जात असल्याने त्याचा परिणाम ठाणेकरांना मुबलक पाणी मिळत नसल्याचेच चित्र आहे.
ठाण्यात ९ ते ११ जुलै या तीन दिवसांसाठी ५० टक्के पाणी कपात लागू करण्यात आली आहे. तत्पूर्वी जूनच्या शेवटच्या आठवड्यात दोन वेळा शटडाऊन घेण्यात आला होता. तेव्हा पासून ठाणेकरांना पाणी कपातीचा सामना करावा लागत आहे. त्यात ११ जुलै पर्यंत पाणी पुरवठा सुरळीत होईल असे पालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने स्पष्ट केले होते. परंतु त्याच काळात माजीवडा येथे जलवाहीनीला गळती लागल्याने पाणी पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. आता सर्व परिस्थिती सावरली असली तरी देखील ठाणेकरांना आजही कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्याचे चित्र आहे. ठाण्यातील बहुतेक भागांना अतिशय कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्याने मोठ मोठ्या गृहसंकुलांना टँकरवरच अवलंबून राहावे लागत असल्याचे चित्र दिसत आहे.
सोमवारी घोडबंदरसह कळवा, मुंब्रा आणि ठाण्यातील काही भागांना कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्याचे दिसून आले. या संदर्भात महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाशी संपर्क केला असता, दुरुस्तीची सफाईचे काम झाले असले तरी सततच्या पडणाऱ्या पावसामुळे गढूळ पाणी येण्याचे प्रमाण अधिक वाढत आहे. त्यामुळे पंपीग होत नसल्याने १० दशलक्ष लीटरची तुट येथे दिसत आहे. त्यातही गढूळ पाणी शुध्दीकरण करण्याच्या प्रक्रियेतही १५ दशलक्ष लीटर पाणी वाया जात असल्याचे दिसत आहे. एकूणच पंपीग योग्य पध्दतीने होत नसल्याने पाणी पुरवठ्यावर परिणाम झाल्याचे दिसत असल्याचे सांगण्यात आले आहे.
दुरुस्तीचे काम झाले आहे. परंतु गढुळ पाण्यामुळे पंपीग योग्य नसल्याने कमी दाबाने पाणी पुरवठा होत आहे. महापालिकेच्या माध्यमातून यावर उपाय केले जात आहेत. परंतु ठाणेकरांनी पाणी जपून वापरावे.विनोद पवार,उपनगर अभियंता, पाणी पुरवठा विभाग, ठामपा