ठाणे : ठाणे जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे अनेक भागांत पूरपरिस्थिती निर्माण झाल्यामुळे नागरिकांचे तर हाल झालेच, शिवाय याचा सर्वाधिक फटका भातशेतीलाही बसला आहे. जिल्ह्यातील पाच तालुक्यांतील एक हजार ८९७ हेक्टर क्षेत्रावरील शेतीचे ३३ टक्केपेक्षा कमी नुकसान, तर २९५.८० हेक्टर क्षेत्रावरील शेतीचे ३३ टक्केपेक्षा अधिक असे एकूण दोन हजार १७५ हेक्टर भातशेतीचे नुकसान झाले. यामध्ये तब्बल पाच हजार ६८८ शेतकऱ्यांना फटका बसला आहे.जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागांत मुसळधार पाऊस मागील काही दिवसांत झाला आहे. यामुळे कल्याण, भिवंडी, अंबरनाथ, बदलापूर, शहापूर आणि मुरबाड तालुक्यांतील शहरी व ग्रामीण भागांत सर्वत्र पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. धरणे ओसंडून वाहू लागल्याने नद्यांनादेखील महापूर आले होते. त्याचे पाणी आजूबाजूच्या भागात शिरल्याने पाणीचपाणी अशी परिस्थिती निर्माण झाली. नद्यांमध्ये धरणांचे पाणी सोडल्याने ते ग्रामीण भागातील शेतांमध्ये शिरले. त्यामुळे हजारो हेक्टर शेती पाण्याखाली आल्याचे दिसून आले. यामध्ये सर्वाधिक मुरबाड तालुक्यातील एक हजार ६५३.७५ हेक्टरवरील भातशेतीचे नुकसान झाले असून चार हजार २८८ शेतकºयांना त्याचा फटका बसल्याची माहिती जिल्हा कृषी अधीक्षक विभागाने दिली.ठाणे जिल्ह्यात २६ जुलै ते २९ जुलै या कालावधीत झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील दोन हजार १७५ हेक्टरवरील भातशेतीचे क्षेत्र बाधित झाल्याचा प्राथमिक अहवाल जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर केला आहे. तसेच आॅगस्ट महिन्याच्या सुरु वातीला २ आॅगस्ट ते ४ आॅगस्ट या कालावधीत झालेल्या पावसामुळे ज्या शेतींचे नुकसान झाले आहेत, त्या शेतातील पिके व फळबागांचे पंचनामे करून अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.- अंकुश माने, जिल्हा कृषी अधीक्षक, ठाणे
अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील २१७५ हेक्टर भातशेती बाधित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 08, 2019 12:38 AM