कल्याण: मुसळधार पावसाचा केडीएमटी उपक्रमाला चांगलाच फटका बसला आहे. ठिकठिकाणी निर्माण झालेल्या पूरसदृश परिस्थितीत प्रवासी संख्या घटल्याने त्याचा परिणाम दैनंदिन उत्पन्नावर झाला आहे. त्याचबरोबर संरक्षक भिंतीअभावी वालधुनी नदीचे पाणी गणेशघाट आगारात घुसल्याने तीन बसचे नुकसान झाले आहे. दरवर्षी अतिवृष्टीमुळे आगारात पाणी घुसून बसगाड्यांचे नुकसान होते. यावेळी तीच परिस्थिती झाली.
उत्पन्न आणि खर्चातील वाढत्या तफावतीमुळे तोट्यात चाललेल्या केडीएमटी उपक्रमाला या ना त्या कारणांमुळे सातत्याने फटका बसत आहे. भंगार बसचा खितपत पडलेला मुद्दा असो अथवा वारंवार बस नादुरुस्त होऊन त्या रस्त्यातच बंद पडण्याची परंपरा, यात प्रमुख आगार असलेल्या गणेशघाट आगाराची दुरवस्था पाहता उपक्रमाला घरघर लागल्याचे स्पष्ट होत आहे. सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू असलेल्या निर्बंधांमध्ये उपक्रमाच्या ५० बस रस्त्यावर धावत आहेत. साडेचार लाखांपर्यंत मिळणारे दैनंदिन उत्पन्न कोरोनाच्या प्रादुर्भावात सध्या दोन लाखांपर्यंत मिळत आहे. रिक्षांची वाढती संख्या याला कारणीभूत ठरत असली तरी मुसळधार पावसाचाही उत्पन्नावर मोठा परिणाम झाला आहे. यात दैनंदिन उत्पन्नात आणखी जवळपास एक लाखाची घट झाली आहे.
-----------------------------------------------
बसचे नुकसान
आगाराच्या पाठीमागील बाजूकडील वालधुनी नदीला लागून असलेली संरक्षक भिंत कोसळली आहे. अन्य ठिकाणीही तीच अवस्था आहे. आगारातील संरक्षक भिंती कोसळल्याने तेथील बसगाड्या आणि अन्य साहित्यांची सुरक्षा धोक्यात आली आहे. जूनच्या शेवटच्या आठवड्यात दोघा चोरट्यांकडून गिअर बॉक्स चोरण्याचा प्रयत्न झाला होता. परंतु सुरक्षारक्षकांनी तो हाणून पाडला. दरम्यान, कोसळलेल्या संरक्षक भिंतींकडे मनपा प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने पुन्हा एकदा पावसाचे पाणी आगारात घुसल्याचे गुरुवारी पाहायला मिळाले. आगाराला लागून असलेल्या वालधुनी नदीच्या पातळीत वाढ झाल्याने आणि भिंत पडल्याने पाणी आगारात घुसले होते. यात तीन बसचे मोठे नुकसान झाले आहे.
----------------------------------------------