ठाणे : दि. २६ आणि २७ जुलै रोजीच्या मुसळधार पावसातून पूरग्रस्त सावरले नसतानाच, शनिवारी आणि रविवारी पुन्हा बरसलेल्या जोरदार पावसाने जनजीवन पार विस्कळीत केले. पुराचे पाणी शेकडो घरांमध्ये शिरल्याने लोकांचे मोठे नुकसान झाले. सोमवारी पावसाने विश्रांती घेतल्याने पूरग्रस्तांना काहीसा दिलासा मिळाला. मात्र, अवघ्या काही दिवसांच्या अंतराने पुराचा दोनवेळा फटका बसल्याने जनसामान्यांचे हाल झाले आहेत.सोमवारी पावसाने पाठ फिरवल्यामुळे जिल्ह्यातील जनजीवन पूर्वपदावर येण्यास मदत झाली. मात्र, रेल्वे वाहतूक अद्यापही पूर्वपदावर आलेली नाही. रेल्वेरुळांवरील खडी मोठ्या प्रमाणात वाहून गेली असून, दुरुस्तीची बरीच कामेही निघाली आहेत. त्यामुळे बदलापूर-कर्जत मार्गावरील रेल्वे वाहतूक अनिश्चित काळासाठी बंद राहणार असल्याची माहिती मध्य रेल्वेचे वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी ए.के. सिंग यांनी दिली.पावसाचा फटका रस्ते वाहतुकीलाही बसला. मुंबई-नाशिक महामार्गावरील वर्दळीच्या कसारा घाटातील एक किमी रस्ता चार ते पाच फूट खचला असून, मातीभराव वाहून गेल्याने रस्ता दबला आहे. सुमारे २०० फूट उंच डोंगरच घाटरस्त्यावर कोसळल्याने, येथील मुंबई-नाशिक लेन बंद ठेवली आहे. दुसरीकडे, खर्डी-वैतरणा रस्ता आंबिवली-खैरपाडा फाट्याजवळ खचल्याने सोमवारी आंबिवली, टेंभा, वैतरणा आणि वाड्याकडे जाणारी वाहतूकही बंद होती. त्यामुळे या भागातील अनेक गावांचा व आदिवासीपाड्यांचा संपर्क तुटला. याशिवाय, कल्याण-अहमदनगर महामार्गावरील माळशेज घाटात सोमवारी संरक्षक भिंत कोसळून भूस्खलन झाले. याच महामार्गावरील कल्याणजवळील रायते पुलास लागून असलेला रस्ताही उल्हास नदीच्या पुरात वाहून गेल्याने या महामार्गावरील वाहतूक दिवसभर बंद होती. आठ दिवसांपूर्वीच्या पुरातून सावरण्याच्या प्रयत्नात असलेल्या बदलापुरातील कुटुंबांना शनिवारी आणि रविवारी पुन्हा पुराचा सामना करावा लागला.
मुसळधार पावसाने विस्कटले संसार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 06, 2019 12:52 AM