भिवंडी: भिवंडी शहरात सोमवारी सायंकाळी पाच वाजल्यापासून प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. या वाहतूक कोंडीमुळे नागरिकांसह प्रवाशांचे प्रचंड हाल झाले.वाहतूक कोंडीत अडकलेल्या प्रवाशांचा पाच मिनिटाच्या अंतरासाठी तब्बल एक ते दीड तासांचा वेळ वाया जात असल्याने प्रवासी मेटाकुटीला आले. विशेष म्हणजे भिवंडीतील मुख्य रस्त्यांबरोबरच उड्डाणपूलांवर वाहतूक कोंडी झाल्याने प्रवासी हतबल झाले होते. या वाहतूक कोंडीतून प्रवाशांची सुटका करण्यासाठी वाहतूक पोलीस प्रशासनाची पुरता दमछाक झाली होती.भिवंडीतील रांजनोली नाका बायपास येथील स्व.बाळासाहेब ठाकरे उड्डाणपुलांबरोबरच कल्याण नाका येथील राजीव गांधी उड्डाणपूल त्याचबरोबर धामणकर नाटकाबद्दल नाका उड्डाणपूल तसेच वंजारपट्टी नाका येथील डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम उड्डाण पुलवर देखील प्रचंड वाहतूक कोंडी झाली. त्याचबरोबर या उड्डाणपूलांच्या खाली देखील अंजुर फाटा, धामणकर नाका, कल्याण नाका ते वंजारपट्टी नाका तसेच कल्याण नाका ते भिवंडी बायपास रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्याने प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला.
दरम्यान, ही वाहतूक कोंडी नेमकी कशामुळे झाली होती याची माहिती वाहतूक विभागाकडून मिळालेली नाही, तर नेहमीच होणाऱ्या या वाहतूक कोंडीतून वाहतूक पोलीस प्रशासन नागरिकांची सुटका कधी करणार असा सवाल नागरिक विचारत आहेत.