ठाणे : मुंबईकडे निघालेल्या एका अज्ञात भरधाव वाहनाने दुभाजकासह उड्डाणपुलालगत उभारलेल्या सिमेंट आणि विटांच्या नामफलकाला धडक दिल्याची घटना घडली. नितीन कंपनीच्या उड्डाणपुलाजवळ गुरुवारी पहाटे ५.२० वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. ही धडक एवढी जोरदार होती, की त्यामुळे नामफलकाचे तुकडे- तुकडे होऊन ते रस्त्यावर पसरले. अपघातग्रस्त वाहनाने लगेच तेथून पळ काढला.
नितीन कंपनीच्या उड्डाणपुलावरून मुंबईच्या दिशेने अनोळखी वाहन वेगाने जात होते. उड्डाणपूलावरुन उतरताना या वाहनाने दुभाजकासह उड्डाणपूलाच्या लगत असलेल्या सिमेंट आणि विटांनी उभारलेल्या नामफलकाला धडक दिली. त्यामुळे फलकाचे अक्षरशः तुकडे- तुकडे होऊन तो रस्त्यावर पडला. या घटनेची माहिती मिळताच आपत्ती व्यवस्थापन आणि वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, धडक देणाऱ्या वाहनचालकाने पळ काढल्याचे समोर आले. या घटनेत कोणालाही दुखापत झाली नसून रस्त्यावर पडलेला मलबा आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी रस्त्याच्या बाजूला करून रस्ता वाहनांसाठी मोकळा केल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली.