ठाणे : मुंबईत टोलेजंग इमारतीला आग लागून चौघांचा मृत्यू तर २० हून अधिक जण जखमी झाल्याची घटना नुकतीच घडली.या पार्श्वभूमीवर ठाणे शहरातही उभ्या राहणाऱ्या टोलेजंग इमारतींमध्ये दुर्दैवाने अशी आगीची घटना घडल्यास आग विझविण्यासाठी ठाणे महापालिकेच्या अग्नीशमन दलाकडे ९० मीटर उंचीची शिडी असणे आवश्यक असल्याची बाब महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे ठाणे जिल्हा अध्यक्ष संदिप पाचंगे यांनी आयुक्तांकडे मागणी करून काही महिन्यापूर्वीच निदर्शनास आणली होती. त्यानुसार, पालिका प्रशासनाने याबाबतची निविदा प्रक्रिया सुरु केली असून येत्या काही महिन्यात अग्निशमन दलाच्या ताफ्यात ९० मीटर उंचीच्या शिडीचा समावेश होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. पालिका प्रशासनानेही याला दुजोरा दिला आहे.
मुंबई शहराच्या सीमेवर असलेल्या ठाणे नगरीत आजघडीला नागरीकरण वेगाने वाढत असून मुख्य शहरासह माजिवडा, घोडबंदर रोड, वर्तकनगर,खारेगाव आदी ठिकाणी उंचउंच इमारती झपाट्याने उभ्या राहत आहेत. एकीकडे ठाणे शहर स्मार्ट सिटीच्या उंबरठ्यावर आहे.परंतु, ठाणे महापालिकेच्या अग्नीशमन दलाकडे ९० मीटर उंचीची शिडी नव्हती. याबाबत मनसे विद्यार्थीं सेनेचे जिल्हाध्यक्ष संदीप पाचंगे यांनी जुलै महिन्यात ठाणे अग्निशमन दलाच्या ताफ्यात ९० मीटर उंचीची शिडी समाविष्ट करावी. अशा मागणीचे निवेदन आयुक्त संजीव जयस्वाल यांना दिले होते.त्यानंतर हा मुद्दा पालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीतही गाजला होता. स्थायी समिती सभापती राम रेपाळे यांनी अशाप्रकारची शिडी अग्निशमन दलाच्या ताफ्यात घेण्याबाबत लवकरात लवकर प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश प्रशासनाला दिले होते.तसेच,मुंबई मनपाप्रमाणे ९० मीटर उंचीची शिडी असावी याकरता तत्कालीन अतिरिक्त आयुक्त सुनील चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली सहा सदस्यांची एक समितीदेखील गठित केली होती. त्यानुसार,ठाणे महापालिकेने ९० मीटरची शिडी विकत घेण्याची प्रक्रिया युद्धपातळीवर सुरु केली असून त्याकरता आवश्यक असलेली निविदा प्रक्रिया राबवण्यात येत आहे. त्यामुळे, मनसेच्या आग्रहामुळे येत्या २४ सप्टेंबरपर्यत इच्छूक निविदाकारांनी या शिडीकरता निविदा सादर करावयाच्या असून तद्नंतर पात्र निविदाकाराकडून अग्निशमन दलासाठी ९० मीटर उंचीची शिडी खरेदी करण्याचे ठरवले आहे अशी माहिती ठाणे महापालिकेचे अधिकारी जगदीश घोलप यांनी दिली.