डोंबिवली : रेल्वे अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांना भरपाईची रक्कम मिळण्यास सहा वर्षे वाट पाहावी लागत असून रेल्वेच्या कार्यपद्धतीचा प्रवासी महासंघाने निषेध केला आहे. पात्र कुटुंबांना न्याय देण्यासाठी वाडीबंदर व मस्जिद येथील रेल्वे अपघात दावा प्राधिकरणाचे कामकाज गतिमान करण्याची मागणी शनिवारी महासंघाने केली आहे, अन्यथा महासंघ उग्र आंदोलन करेल, असा इशाराही देण्यात आला आहे.महासंघाचे संस्थापक अध्यक्ष मनोहर शेलार म्हणाले की, मुंबई महानगर क्षेत्रातील वाढते अपघात रोखण्यासाठी महाराष्ट्र शासन आणि रेल्वे प्रशासनाने गांभीर्याने दखल घेऊन वेगाने संरक्षक उपाययोजना कराव्यात. कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीत १ जानेवारी ते ३१ मार्च या तीन महिन्यांच्या काळात विविध ठिकाणच्या रेल्वे अपघातात सुमारे ७४ नागरिकांचे बळी गेल्याचे धक्कादायक वास्तव उघड झाले आहे. अन्य ठिकाणीही अशा घटनांत वाढ झाल्याचे दिसते. गाडीच्या दरवाजात उभे राहून प्रवास करणे, प्रवाशांची गर्दी व बेजबाबदारपणे रेल्वे रुळ ओलांडणे या कारणाने हे अपघात झाल्याची माहिती शेलार यांना रेल्वे सूत्रांनी दिली. मुंबईच्या उपनगरीय रेल्वे क्षेत्रात रेल्वे अपघात व काही प्रमाणात आत्महत्यांच्या घटनांमध्येही वाढ झाली आहे. यामुळे लोहमार्ग पोलिसांवर कामाचा ताण वाढल्याने ते त्रस्त झाले आहेत. त्यामुळे यावर उपाययाेजनांची मागणी हाेत आहे.आर्थिक संकटामुळे आत्महत्यांत वाढकोरोना व लॉकडाऊनच्या काळात निर्माण झालेल्या गंभीर आर्थिक संकटामुळे धावत्या गाडीसमोर झोकून आत्महत्या करण्याच्या प्रमाणात वाढ झाल्याचे निरीक्षण लोहमार्ग पोलीस व मोटरमन आणि लोकोपायलट यांनी नोंदवल्याची माहितीही त्यांना मिळाली असल्याचे शेलार म्हणाले. त्यामुळे वाढते अपघात हे गंभीर असून यावर राज्य शासन, रेल्वे प्रशासन यांनी एकत्रित तोडगा काढण्याची गरज आहे. त्यावर प्रतिबंध घालावा व त्या उपाययोजनांसाठी प्रवासी महासंघ सर्वतोपरी सहकार्य करेल, असेही ते म्हणाले.
रेल्वे अपघातांतील मृतांच्या वारसांना वर्षानुवर्षे भरपाईची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 05, 2021 12:29 AM