लोनाड : भिवंडी तालुक्यातील वडपे गावातील जनार्धन भोईर या शेतकरी उद्योजकांनी हेलिकॉप्टर खरेदी केल्याची बातमी वाऱ्यासारखी सर्वत्र पसरली हाेती. १५ मार्चला वडपे गावात हेलिकॉप्टर जनार्धन भोईर यांच्या मालकीचे हेलिकॉप्टर दाखल हाेणार हाेते. त्यासाठी हेलिपॅड तयार करण्याचे कामही जोरात सुरू होते. पण, कोरोनाची दुसरी लाट आल्याने हेलिकॉप्टरची डिलिव्हरी लांबणीवर गेल्याचे भोईर यांनी सांगितले.
जर्मन, फ्रान्स बनावटीचे असलेले हेलिकॉप्टरचे पार्टस हे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे वेळेत न मिळाल्यामुळे १५ मार्चची डिलिव्हरी पुढे गेल्याचे भोईर म्हणाले. या हेलिकॉप्टरसाठी लागणारे इंधन भरण्याची व्यवस्थेविषयी भोईर म्हणाले की, मुंबई, पुणे येथे याची व्यवस्था आहे. आपण स्वतः याचा साठा आपल्या हेलिपॅडच्या ठिकाणी उपलब्ध करण्याचे नियोजनही करत असल्याचे भोईर यांनी सांगितले. हौशेला मौल नाही असे असले तरी वडपेवासीय भोईर यांची हाैस पूर्ण होण्याच्या मार्गात कोरोना आडवा आल्याने आता हेलिकॉप्टर कधीं येणार याकडे सर्वांचे लक्ष्य लागले आहे.