उल्हासनगर : शहरातील शासकीय कनिष्ठ बालगृह वसतिगृहातील मुलांच्या वाट्याला नरकयातना आल्या असून सौरऊर्जा यंत्रणा बंद पडल्याने मुलांना थंड पाण्याने अंघोळ करावी लागत आहे. तसेच पिण्याचे अॅक्वागार्ड मशीन, टेलिफोन बंद असून संरक्षण भिंती पडल्याने मैदान जुगाराचा व गर्दुल्ल्यांचा अड्डा बनला आहे. उल्हासनगरात जिल्ह्यातील सर्वाधिक शासकीय कनिष्ठ व वरिष्ठ बालगृहांसह इतर वसतिगृहे असून त्यांची स्थिती अत्यंत दयनीय झाली आहे. कॅम्प नं-४, सुभाष टेकडी परिसरात कनिष्ठ बालगृह असून बालगृहात ४० मुले निवासी शिक्षण घेत आहेत. वसतिगृहाची व मैदानाची संरक्षण भिंत झोपडपट्टीधारकांनी तोडून मधोमध रस्ता केला आहे. परिसरातील जुगारी व गर्दुल्ल्यांनी मैदानाचा ताबा घेतला असून त्याचा परिणाम मुलांवर होत आहे. बालगृहातील मुलांच्या गाद्या व चादरींना दुर्गंधी सुटली असून गाद्यांवर झोपल्याने मुले आजारी पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पिण्याच्या पाण्याचे अॅक्वागार्ड वर्षानुवर्षे बंद पडल्याने थेट नळावाटे आलेल्या पाण्याचा वापर पिण्यासाठी व अंघोळीसाठी करीत आहेत. बालगृहातील मुलांना पावसाळा व हिवाळ्यात गरम पाणी अंघोळीसाठी मिळावे, यासाठी शासनाने लाखो रुपये खर्चून मैदानात सौरऊर्जा यंत्रणा उभी केली आहे. मात्र, यंत्रणा बंद पडल्याने मुलांना थंड पाण्यानेच अंघोळ करावी लागत आहे. बालगृहातून मुले पळून जाण्याच्या घटना घडत असून बांधकाम विभागाकडे संरक्षण भिंत बांधण्याची मागणी केली आहे. (प्रतिनिधी)अपुरा कर्मचारीवर्ग, सुखसुविधेचा अभावशासनाच्या अनियमित निधीअभावी टेलिफोन बंद पडला असून संपर्क साधण्यासाठी कोणतीही सुविधा नसल्याचे उघड झाले आहे. आई किंवा वडील नसणारे, निराधार, गरीब व भीक मागणाऱ्या मुलांना बालगृहात ठेवले जाते. बालगृहातील अपुरा कर्मचारीवर्ग, सुखसुविधेच्या अभावामुळे मुलांची संख्या दिवसेंदिवस रोडावत चालली आहे. संरक्षण भिंत तोडल्याने मैदानाच्या मधोमध रस्ता झाला असून कोणीही आत-बाहेर जाऊ शकतो. तसेच दिवसा किक्रेट खेळणारी मुले तर रात्री गर्दुल्ले व जुगाऱ्यांनी मैदानाचा ताबा घेतला आहे.
कनिष्ठ बालगृहातील मुलांना नरकयातना
By admin | Published: July 27, 2015 11:27 PM