ठाणे : मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे सध्या होत असलेले कोरोनाचे संक्रमण हे अधिक आहे. नागरिकांनी दक्ष राहून स्वत:ची काळजी घेऊन शासन व महापालिका प्रशासनाने घालून दिलेले नियम व निर्बंधांचे पालन काटेकाेर करावे, असे आवाहन महापौर नरेश म्हस्के यांनी केले आहे.
शासन व पालिकेने कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनेची अंमलबजावणी सुरू केली आहे. मात्र, काही नागरिक त्यांचे पालन करीत नसल्याने कोरोनाचा फैलाव वाढत आहे. वाढत्या रुग्णसंख्येसाठी रुग्णालये अपुरी पडत आहेत. खासगी रुग्णालयांतही बेड मिळत नाहीत. सध्या विलगीकरण कक्षाची सुविधाही अपुरी असून, औषधपुरवठ्यावरही परिणाम होत आहे. अनेक नागरिक सार्वजनिक ठिकाणी विनामास्क फिरून गर्दी करीत आहेत. साेशल डिस्टन्सिंगचे भानही त्यांना राहिलेले नाही. हे जिवावर बेतणारे असल्याचा इशारा महापाैर म्हस्के यांनी दिला.
कोविड प्रतिबंधात्मक लस उपलब्ध झाल्यानंतर पालिकेने विक्रमी लसीकरण मोहीम राबविली आहे. शासन व महापालिका हे सर्व आपल्या सुरक्षिततेसाठी करीत आहे; पण नागरिकांकडून सहकार्य मिळत नाही, याची खंत असल्याचे महापौरांनी नमूद केले. सध्या लहान मुलांमध्येही कोरोनाने वेगाने फैलावत आहे. त्यामुळे नागरिकांनी बाहेर पडताना नाक व तोंड पूर्णपणे झाकले जाईल या पद्धतीने मास्क लावावा, सोशल डिस्टन्सिंग पाळावे, हात स्वच्छ धुवावेत, सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये, परिसर स्वच्छ ठेवावा, विनाकारण प्रवास टाळावा, असे आवाहन महापाैरांनी केले आहे.
धडकी भरवणारी आकडेवारी
गेल्या आठवडाभरापासून ठाण्यातील कोरोना रुग्णांचा दरराेजचा आकडा हा १५०० च्या वर आहे. रविवारी १७०१, शनिवारी सुमारे १६५० रुग्ण आढळले हाेते. ही वाढ गेल्या वर्षीच्या तुलनेत दुप्पट असून, ही आकडेवारी धडकी भरविणारी आहे. महापालिका प्रशासन किंवा पोलीस प्रशासन कारवाई करेल आणि त्यानंतरच आम्ही नियम पाळू, ही भूमिका याेग्य नाही. प्रत्येकाने जबाबदारी ओळखल्यास ठाणेकर काेराेनाची ही साखळी नक्कीच ताेडतील, असा विश्वास महापौरांनी व्यक्त केला.