आशिष राणे, वसई
वसई विरार महापालिका प्रशासनाने त्यांच्या हद्दीतील दोन डोस झालेल्या नागरिकांसाठी लोकल सेवेचा पास प्राप्त होणार आहे. वसई, विरार, नालासोपारा व नायगांव या चार रेल्वे स्थानकांमध्ये पालिकेचे ‘मदत कक्ष’ (Help Desk) स्थापन करण्याचा निर्णय घेतला असून नागरिकांना सदर सुविधेचा लाभ देण्यासाठी दि.11 ऑगस्ट, 2021 पासून सुरुवात होत असल्याची माहिती जनसंपर्क अधिकारी गणेश पाटील यांनी मंगळवारी सायंकाळी लोकमत ला दिली आहे
या सुविधांचा नेमका लाभ व कुठं मदत कक्ष स्थापन करण्यात आले आहेत यासाठी अफहिक माहिती देण्यासंदर्भात पाटील यांनी सांगितले की, राज्य शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार कोरोना प्रतिबंधक लसीचा दुसरा डोस घेऊन 14 दिवस पूर्ण केलेल्या नागरिकांना दि 15 ऑगस्ट, 2021 पासून रेल्वे लोकल प्रवास करण्यास परवानगी देण्यात आली आहे. तर सदर प्रवासाची सुविधा ही फक्त मासिक पासवर (Monthly Season Tickets) प्रवास करण्यासाठी असेल. तसेच दैनंदिन प्रवास किंवा इतर प्रवासासाठी सदर सुविधा उपलब्ध असणार नाही असे ही स्पष्ट केले आहे.
दरम्यान नागरिकांना सदर सुविधेचा लाभ देण्यासाठी दि.11ऑगस्ट,2021 पासून वसई विरार शहर महानगरपालिका हद्दीतील वसई, विरार, नालासोपारा व नायगांव या चार रेल्वे स्थानकांमध्ये महानगरपालिकेचे ‘मदत कक्ष’ (Help Desk) सकाळी ०7.०० ते रात्री 11.०० वाजेपर्यंत याकामी स्थापन करण्यात येणार असून कोरोना प्रतिबंधक लसीचा दुसरा डोस घेऊन 14 दिवस पूर्ण केलेल्या नागरिकांना रेल्वे प्रवासाचा लाभ घेण्यासाठी मदत कक्षावर नागरिकांना काही महत्त्वाची कागदपत्रे सादर करावी लागणार आहेत.
लोकल पास सेवेसाठी ही असतील कागदपत्रे
1) कोरोना प्रतिबंधक लसीचा दुसरा डोस घेतला असलेबाबतचे प्रमाणपत्राची (Vaccination Certificate) छायांकित प्रत (zerox copy).
2) फोटो असलेले मूळ ओळखपत्र (Original Photo ID) व त्याची छायांकित प्रत (शक्यतो आधार कार्ड)
किंबहुना वरील कागदपत्रांची ‘मदत कक्षा मार्फत’ तपासणी केल्यानंतर तपासणी केले बाबत कागदपत्रांवर विशेष शिक्का लावण्यात येईल. त्यानंतर सदर कागदपत्र रेल्वे तिकीट काऊंटरवर दाखवून प्रवाशांना मासिक पास खरेदी करता येईल.
कोणती काळजी व सूचना पाळाव्या लागतील
तर प्रवास करतेवेळी नागरिकांना 1)पास, 2) लसीकरणाचे प्रमाणपत्र व ३) ओळखपत्र सोबत ठेवणे आवश्यक राहील. सदर सुविधेचा लाभ घेतेवेळी मदत कक्ष, रेल्वे तिकीट काऊंटरवर तसेच प्रत्यक्ष प्रवास करतेवेळी नागरिकांनी गर्दी न करता एकमेकांमध्ये सुरक्षित अंतर ठेवणे, मास्क परिधान करणे तसेच शासनाने कोरोना संबंधी दिलेल्या सर्व नियमांचे पालन करून सहकार्य करावे असे ही आवाहन वसई विरार शहर मनपा आयुक्तांनी या प्रसिद्धी पत्राद्वारे केलं आहे