ठाणे : एकेकाळी अनेक नामचीन गुन्हेगारांना पकडणा-या आणि राष्टÑपती पदकाने सन्मानित असलेले निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त शिवाजी देसाई (७५) यांच्यासह दोघांना ठाण्यात लुबाडल्याची घटना सोमवारी घडली. याप्रकरणी ठाणेनगर आणि नौपाडा या दोन पोलीस ठाण्यांमध्ये दोन वेगवेगळे गुन्हे दाखल झाले आहेत.नवी मुंबईच्या नेरूळ परिसरात राहणारे देसाई हे २४ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वा. च्या सुमारास ठाण्याच्या बाजारपेठेतील अग्निशमन केंद्राजवळील रस्त्याने सिडको बस थांब्याकडे जात होते. त्याचवेळी २५ ते ३० वयोगटातील दोघांनी त्यांना ओळखत असल्याचा बहाणा केला. त्यातील एकाने आपण लक्ष्मी ज्वेलर्स दुकानमालकाचा मुलगा असल्याचीही बतावणी करून त्यांच्या हातातील दोन अंगठ्या आणि एक सोनसाखळी असा ६५ हजारांचा ऐवज काढून घेतला. तर त्यांच्यापैकीच दुस-याने देसाई यांच्याशी पहिल्याशी ओळख करून त्यांना बोलण्यात गुंतविले. त्याचवेळी पहिल्याने त्याच्या अंगठ्या आणि सोनसाखळी रुमालामध्ये ठेवून तो रुमाल देसाई यांच्या बॅगेत ठेवल्याचा बहाणा करून त्यांचे दागिने लुबाडले. आपल्याला लुबाडल्याचे लक्षात आल्यानंतर देसाई यांनी याप्रकरणी ठाणेनगर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. पोलीस उपनिरीक्षक एस. बी. तागड हे याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.तर अन्य एका घटनेत ६५ वर्षीय महिला सोमवारी (२४ सप्टेंबर रोजी) दुपारी १२.१५ वाजण्याच्या सुमारास नौपाड्यातील विश्वेश्वरी को. आॅपरेटीव्ह सोसायटीचा जिना चढत होती. त्याचवेळी एका अनोळखी भामट्याने त्यांना बोलण्यात गुंतवून त्यांची ४० हजारांची १८ ग्रॅम वजनाची सोनसाखळी काढून घेतली. याप्रकरणी त्यांनी नौपाडा पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
संमोहित करून चक्क निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्तासह दोघांना ठाण्यात लुबाडले
By जितेंद्र कालेकर | Published: September 25, 2018 9:54 PM
ज्या अधिकाऱ्याने आयुष्यभर फसवणूक करणा-या भामटयांना पकडले. त्यांची एमओबी (फसवणूक करण्याच्या पद्धती) जाणून घेतली. तरीही अशाच सराईत चोरटयांनी एकेकाळी आपली कारकीर्द गाजवलेल्या निवृत्त पोलीस अधिकारी शिवाजी देसाई यांनाच लुबाडल्याची घटना ठाण्याच्या बाजारपेठेत घडली.
ठळक मुद्दे ठाणेनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल राष्टÑपती पदकाने सन्मानित निवृत्त अधिकारीसोनसाखळीसह ६५ हजारांचा ऐवज लुबाडला