ठाणे : एटीएममध्ये पैसे काढताना मशिनमध्ये अडकलेले कार्ड बाहेर काढताना, ते बदलून एका भामट्याने संपत यादव (५०) यांच्या खात्यातून दोन लाख १५ हजार ४८२ रुपये काढून फसवणूक केली. यादव हे पाणी बिल व मालमत्ता कर भरण्यासाठी पैसे काढण्यासाठी गेल्यावर, त्यांच्या खात्यात अवघे २३ रुपये शिल्लक असल्याचे समोर आले. त्यानंतर, त्यांनी ४ मार्च, २०१९ रोजी फसवणुकीची तक्रार दाखल केली.लोकमान्यनगर येथे राहणारे यादव आणि त्यांची पत्नी जयनंदा यांचे स्टेट बँक आॅफ इंडिया येथे जॉइंट बचत खाते आहे. १६ डिसेंबरला रात्री सव्वानऊ वाजण्याच्या सुमारास लोकमान्यनगर येथील एटीएममध्ये पाचशे रुपये काढण्यासाठी गेले होते. पैसे काढले, परंतु मशिनमध्ये कार्ड अडकले, म्हणून त्यांनी एका अनोळखी व्यक्तीला मदतीसाठी बोलावले. त्या व्यक्तीने कार्ड काढून देताना, त्यांना त्रिलोकनाथ तिवारी यांच्या नावाचे कार्ड दिले. त्यानंतर, त्याने त्यांच्या कार्डचा वापर करून, २ लाख १५ हजार ४८२ रुपये १६ डिसेंबर ते १३ जानेवारीदरम्यान काढले. यादव १७ जानेवारीला पाणी बिल आणि मालमत्ता कर भरण्यासाठी पैशांची गरज असल्याने बँकेत गेले होते. तेथे पासबुक अपडेट केल्यावर खात्यावर २३ रुपये असल्याचे निदर्शनास आल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले़
एटीएम कार्ड काढण्यासाठी घेतलेली मदत पडली सव्वादोन लाखांना
By ऑनलाइन लोकमत | Published: March 06, 2019 1:52 AM