ठाणे : जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना हा साथरोग म्हणून घोषित केला आहे. भारतातही या साथीचा प्रसार होत असून ठाणे शहरातही या साथ रोगाने जवळपास १२ व्यक्ती बाधित झाल्या आहेत. भविष्यात याची व्याप्ती रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणात वैद्यकिय उपकरणे, औषधी साठा, वस्तूंची गरज भासणार असून शहरातील दानशूर व्यक्तींनी करोना विरूद्ध लढण्यासाठी वैद्यकिय उपकरणे आणि औषधांसाठी मदत करण्याचे व या लढ्याला बळ देण्याचे आवाहन महापालिका आयुक्त विजय सिंघल यांनी केले आहे. ठाणे शहरातही कोरोना बाधीतांची संख्या वाढली आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणमधील सर्वात दाट लोकवस्तीचे शहर असलेल्या ठाणे शहरामध्ये आतापर्यंत एकूण १२ बाधित रूग्णांची नोंद झाली आहे. कोरोनाचा वाढता प्रादूर्भाव रोखण्यासाठी कडक उपाययोजना करण्याची गरज आहे. कोरनाविरूद्धचा हा लढा अधिक प्रभावी करण्यासाठी आणि यातील बाधितांना मदत करण्यासाठी मोठया प्रमाणात १०० व्हेंटिलेटर्स, एन ९५ मास्क, थ्री लेयर्स मास्क, मेडिकल गॉगल्स, हातमोजे, पीपीई किट्स आदी वैद्यकीय उपकरणांची आवश्कता भासणार आहे. त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात औषधे आणि निर्जंतुकीकरण करण्यासाठी आवश्यक त्या औषधांची गरज भासणार आहे. त्याचबरोबर शहरातील बेघर, भिकारी, स्थलांतरित कामगार यांच्यासाठी अन्न-धान्याचीही आवश्यकता आहे. यापूर्वीही ठाणे शहरातील दानशूर व्यक्ती, स्वयंसेवी संस्था हे आपत्कालीन परिस्थितीमध्ये ठाणेकरांच्या मदतीला धाऊन आले आहेत. विविध कंपन्यांनीही आपला मदतीचा हात पुढे केला होता. या पाशर््वभूमीवर या शहराचे हितचिंतक म्हणून कोरोनाशी लढा देण्यासाठी आपण आपला मदतीचा हात पुढे करावा असे आवाहन महापालिका आयुक्तांनी केले आहे. यासंदर्भात अधिक माहितीसाठी सहाय्यक संचालक, नगर रचना श्रीकांत देशमुख यांच्याशी ९४२३७७६१४५ या भ्रमणध्वनीवर संपर्कसाधावा असेही आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.