लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : अवघ्या तीन वर्षांची असताना लावण्या चौधरी हिला हृदयविकाराचा त्रास होऊ लागला. कुटुंबाने औषधोपचार सुरू केले. ती आता पाच वर्षांची झाली असून, तिला डॉक्टरांनी हृदयप्रत्यारोपण करण्यास सांगितले आहे. आर्थिक परिस्थितीशी झगडत असलेल्या या कुटुंबाला २५ लाखांचा खर्च परवडणारा नसल्याने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून सोमवारी स्वामी फाउण्डेशनने आर्थिक साहाय्य केले. मदत कर, ठाणेकर, अशा शब्दांत ठाणेकरांना या संस्थेने आवाहन केले.
लावण्या चौधरी हिला हृदयविकारामुळे श्वास घेण्यास प्रचंड त्रास होत आहे. ती अवघ्या पाच वर्षांची आहे. तिची आई नंदा चौधरी यांना पतीचे सहकार्य मिळत नसल्याने अनेकांकडे त्यांनी मदतीचे आवाहन केले आहे. एका खासगी रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू असून, महिन्याला २० हजार रुपये तिच्या औषधोपचारांचा खर्च आहे. आता डॉक्टरांनी तिचे हृदय बदलण्यास सांगितले असून, त्यासाठी २५ लाख रुपये खर्च आहे. ही मदत जमविण्यासाठी नंदा यांना प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागत आहे. ही परिस्थिती स्वामी फाउण्डेशनचे संस्थापक महेश कदम यांना समजल्यावर त्यांनी महिला दिनाचे औचित्य साधून या पाच वर्षांच्या चिमुरडीला २५ हजार रुपयांचा धनादेश दिला. कदम यांनी लावण्याला मदत मिळावी म्हणून सोशल मीडियावर आवाहनदेखील केले होते. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत नारपोली पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी शैलेश शिंदे यांनी दहा हजार रुपये, तर प्रतीक नार्वेकर यांनी १० हजार रुपये दिले. ही मदत मनसेच्या महिला अध्यक्ष समीक्षा मार्कंडे व ‘लोकमत’च्या पत्रकार प्रज्ञा म्हात्रे यांच्या हस्ते देण्यात आली. यावेळी लावण्याची आई नंदा यांना अश्रू अनावर झाले होते.
------–-----------
माझी मुलगी स्वामिनी कदम हिचा आठ दिवसांनी वाढदिवस आहे. तिच्या वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून तो खर्च लावण्यासाठी मदत म्हणून दिला.
- महेश कदम
----------