प्रज्ञा म्हात्रे
ठाणे : गेली एक वर्षे येऊरचे जंगल कचरामुक्त करण्यासाठी धडपडणाऱ्या कपिल मांढरे या तरुणाने तेथून संकलित केलेला कचरा विकून एका तृतीयपंथीला अन्न धान्य स्वरूपात मदत केली. हा कचरा विकून आलेल्या पैशातून कपिलने दिव्या नावाच्या तृतीयपंथीला ही मदत केली आहे.
पर्यावरणाचे रक्षण करता करता सामाजिक भान जपणाऱ्या या कपिलने याआधीही गोरगरिबांना मदत केली आहे. लॉकडाऊनमध्ये तृतीयपंथीना हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहे. त्यामुळे लॉकडाऊनमुळे स्वतःबेरोजगार असताना गरजूंना मदत करून या तरुणाने एक आदर्श नव्या पिढीसमोर ठेवला आहे.
ठाणे शहरालगत असलेले येऊरचे जंगल ही जैवविविधतेने नटलेले आहे. परंतु मानवी चुकांमुळे दिवसेंदिवस या पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. कोविड काळात प्रत्येकाला पर्यावरणाचे महत्त्व पटले आहे. तरुण मंडळी पर्यावरण रक्षणासाठी पुढे सरसावताना दिसत आहे.कपिल मांढरे हा तरुण गेली एक वर्षे येऊरचे जंगल साफ करण्यासाठी आठवड्यातून किमान तीन वेळा तर कधी दररोज मुंबईहून ठाण्यात येत आहे. येऊरच्या जंगलात बेजबाबदार नागरिकांनी फेकलेल्या काचेच्या, प्लास्टिकच्या बाटल्या, पिशव्या हे सगळे वेचून ते संकलित करीत आहे. कपिलला लॉकडाऊनमुळे नोकरी गमवावी लागली. त्यामुळे गरजूंना मदत करण्यासाठी त्याच्याकडे पैसे नसल्याने तो हा कचरा विकून येणाऱ्या पैशातून मदत करीत आहे. या पैशातून त्याने दिव्या या तृतीयपंथीसह टिटवाळा कोनेगाव आदिवासी भागातदेखील त्याने मदत केली आहे.
"कोरोनाकाळात माझी नोकरी गेली. नोकरी असताना सढळ हाताने मदत करत होतो. पण आता ती नसताना समोर आलेल्या रिकाम्या हातात काय द्यायचे? मी नेहमी बघतो स्टेशन आणि रस्त्यावर कचरा वेचक कचरा विकून तेसे कमावतात आणि जगतात. तिथून मला ही युक्ती सुचली. जंगलातील प्लास्टिक कचरा बॉटल गोळा करून त्या एका भंगार वाल्याला विकल्या त्यातून मिळणाऱ्या पैशाने गरजू लोकांना थोडी का होईना मदत करीत आहे," असे कपिलने सांगितले.