लाेकमत न्यूज नेटवर्कठाणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे ठाणे महानगरपालिकेने, नालेसफाईबाबत तक्रारी आणि अभिप्राय नोंदविण्यासाठी हेल्पलाईन ( क्रमांक ०२२ - २५३९९६१७) सुरू केली आहे. त्यावर ठाणेकर नालेसफाईबाबत प्रतिसाद नोंदवू शकतात, पालिका त्याची तत्काळ दखल घेऊन आवश्यक ती कारवाई करेल, अशी माहिती ठाणे महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी दिली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी सायंकाळी ठाणे शहरातील रस्ते आणि नालेसफाईच्या कामांचा पाहणी दौरा केला. या दौऱ्यात आमदार प्रताप सरनाईक, माजी महापौर नरेश म्हस्के, मीनाक्षी शिंदे आणि महापालिका आयुक्त अभिजित बांगर सहभागी झाले होते.
वसंत विहार येथील कॉर्नवूड चौक येथील मलनिस्सारण कामाची पाहणी करून कामास विलंब झाल्याबद्दल संबंधित कार्यकारी अभियंत्यांना खडेबोल सुनावले. या कामातील हलगर्जी करणाऱ्या अधिकाऱ्याकडून खुलासा मागवण्याचे आदेश दिले. खुलासा समाधानकारक नसेल तर त्या अधिकाऱ्यावर जबाबदारी निश्चित करुन कारवाईचे आदेशही शिंदे यांनी बांगर यांना दिले. ठाणे शहरासाठी राज्य शासनाकडून ६०५ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. सध्या २८२ रस्त्यांची कामे प्रभाग समितीनिहाय सुरू आहेत. यात २१४ कोटींच्या पहिल्या पॅकेजमध्ये १२७ रस्त्यांची कामे सुरू आहेत, तर ३९१ कोटींच्या दुसऱ्या पॅकेजमध्ये १५५ रस्त्यांची कामे सुरू आहेत.
सफाई कामगारांशी साधला संवादठाण्यातील पाहणी दौऱ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पवारनगर येथील सायकल ट्रॅकची सफाई करणाऱ्या कर्मचाऱ्याबरोबर संवाद साधला. त्यांची जबाबदारी व त्यांना मिळणाऱ्या सुविधांबाबत मुख्यमंत्र्यांनी माहिती घेतली. तसेच कर्मचाऱ्यांचे कोणतेही प्रश्न प्रलंबित राहू नयेत, त्यांना काम करण्यासाठी पूरक वातावरण निर्माण होईल, असा प्रयत्न व्हावा अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या.