शेणवा : शहापूर तालुक्यातील वन्यजीव विभागाच्या तानसा अभयारण्यातून चितळ प्रजातीच्या २१ हरणांचा कळप दिसेनासे झाला आहे. अचानक गायब झालेला हा हरणांचा कळप नेमका गेला कुणीकडे, याबाबत वन्यजीव विभागाला थांगपत्ताही लागत नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. ही हरणे इतरत्र स्थलांतरित झाली? त्यांची शिकार झाली, की अन्न पाण्याविना मृत पावली, हा संशोधनाचा विषय ठरला आहे.वणव्यात वेली, झाडे, झुडपांसह अन्न जळून खाक झाल्याने निवाऱ्यासह अन्नपाण्याची गंभीर समस्या भेडसावणाऱ्या पशुपक्ष्यांना स्थलांतरित व्हावे लागत आहे. लोकवस्तीकडे येणाऱ्या पशुपक्ष्यांना जीव गमवावा लागण्याच्या घटना ताज्या असतानाच तानसा अभयारण्यातून अचानक गायब झालेल्या हरणांच्या कळपाबाबत तर्कवितर्क लढविले जात आहेत. उरण येथील एका नेव्ही कॅम्पमध्ये बंदिस्त असलेल्या चितळ प्रजातीच्या २१ हरणांच्या कळपाला मुक्त संचार करता यावा, या उद्देशाने वन्यजीव विभागाने आठ वर्षांपूर्वी तानसा, वैतरणा, खर्डी, वाडा, परळी, सूर्यमाल अशा ३२० चौरस किमी विस्तीर्ण क्षेत्र असलेल्या तानसा अभयारण्यात सोडले होते. तानसा वनपरिक्षेत्रातील क्वारीपाडा जंगलात सोडण्यात आलेला पाणथळीच्या जागी दिसणारा हरणांचा कळप आता एक ते दीड वर्षापासून दिसेनासा झाल्याची माहिती वनकर्मचाऱ्याने नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर दिली.
सुरक्षेचा प्रश्न गंभीरहरणांचा हा कळप इतरत्र स्थलांतरित झाला आहे का, असेल तर कोणत्या ठिकाणी सुरक्षित आहे ? आता न दिसणाऱ्या हरणांची शिकार झाली? की अन्न पाण्याविना मृत पावली, याबाबत शोध घेणे आवश्यक असून, या हरणांच्या सुरक्षेसह जंगलातील इतर पशुपक्ष्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे.