पंकज पाटील / उल्हासनगरनिवडणुका म्हटल्या तर उमेदवाराकडे दररोज जेवणाच्या पत्रावळ्या उठतात. प्रत्येक कार्यकर्त्याला हवे ते जेवण द्यावे लागते. एवढेच नव्हे तर पेड कार्यकर्त्यांचींदेखील खाण्यापिण्याची पूर्ण सोय करावी लागते. मात्र, उल्हासनगरमधील एक प्रभाग असादेखील आहे जेथे कार्यकर्ते सकाळी प्रचारासाठी येतांना दुपारच्या जेवणाचा डबा घेऊन येतात. एवढेच नव्हे तर दुपारच्या सत्राचा प्रचार संपल्यावर सर्व कार्यकर्ते एकत्रित डबा खाऊन पुन्हा निवडणुकीच्या कामात व्यस्त होतात. निवडणूक म्हटली की कार्यकर्ते, प्रचार, कार्यकर्त्यांची व्यवस्था ठेवणे अशा अनेक गोष्टी आल्या. मात्र, यंदाच्या निवडणुकीत नोटबंदीचा फटका जाणवत असले तरी खर्च हा करावाच लागत आहे. उल्हासनगरची निवडणूक लढविणे ही खर्चिक बाब मानली जाते. लाखो नव्हे तर करोडो रुपये खर्च करण्याची वेळ काही उमेदवारांवर आली आहे. आपली प्रतिष्ठा जपण्यासाठी काही उमेदवार पेड कार्यकर्ते उभे करित आहेत. ऐवढेच नव्हे तर त्यांची सर्व सोय उमेदवारांना करावी लागत आहे. एक काळ असा होता की, निवडणुकीत कार्यकर्ते निष्ठेने काम करित होते. कोणताही मोह न बाळगता हे काम करणारे कार्यकर्ते हल्ली सापडत नाहीत, ही ओरड सर्वत्र आहे. असे असले तरी उल्हासनगरच्या प्रभाग क्रमांक ५ मध्ये दररोज काही कार्यकर्ते घरातून निघतांनाच दुपारच्या जेवणाचा डबा घेऊन निघत आहेत. जेवणाचा डबा कार्यालयात ठेऊन हे कार्यकर्ते निवडणुकीच्या प्रचारासाठी प्रभागात फिरत आहेत. केवळ दुपारी दोन तास जेवणाची सुटी घेऊन ते आपले खरे योगदान देत आहेत.
येथे कार्यकर्ते आणतात घरचे जेवण
By admin | Published: February 17, 2017 1:56 AM