डोंबिवली: शहर स्वच्छतेप्रकरणी घसरलेल्या मानांकनाचा केडीएमसीने धसका घेतल्यानंतर महापालिका प्रशासनाने रस्त्यावर पडलेले डेब्रिज उचलण्याचा निर्णय घेतला खरा पण वास्तव पाहता या सुविधेचा पुरता बो-या वाजल्याचे चित्र शहरात दिसून येते. डोंबिवली पुर्वेकडील एमआयडीसी फेज १ मधील सावित्रीबाई फुले कलामंदिर ते डोंबिवली अग्नीशामक केंद्राच्या रस्त्यालगत बिनधास्तपणे डेब्रिज टाकले जात असून ते वेळेवर उचलले जात नसल्याने या रस्त्याच्या आजुबाजुला डेब्रिजचे ढिगारे मोठया प्रमाणावर निर्माण झाले आहेत.घरे, इमारती, बंगले आदि मालमत्तांची दुरूस्ती केल्यानंतर पदपथ अथवा रस्त्यांवर काम करणारे खासगी कंत्राटदार सर्रासपणे डेब्रिज टाकतात. कल्याण-डोंबिवली, टिटवाळा परिसरातील मोकळया जागांवर अशा प्रकारचे डेब्रिज टाकलेले प्रामुख्याने पहावयास मिळते. दरम्यान शहर स्वच्छतेच्या मानांकनात घसरण झाल्यानंतर जाग आलेल्या डेब्रिज ‘आॅन कॉल’ उचलण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी कंत्राटदार नेमण्यात आला त्याचबरोबर डोंबिवली आणि २७ गावांसाठी तर कल्याण पुर्व व पश्चिम आणि टिटवाळा परिसरातील नागरीकांसाठी स्वतंत्र मोबाईल क्रमांक देऊन विनाशुल्क डेब्रिज उचलण्यासाठी ‘आॅन कॉल’ ही सुविधा सुरू करण्यात आली. कॉल केल्यास तत्काळ डेब्रिज उचलला जातो असा दावा प्रशासन अधिका-यांकडून केला जात असलातरी सध्याचे वास्तव पाहता या सुविधेचे तीन तेरा वाजले आहेत. एकिकडे शहरस्वच्छतेचे तुणतुणे अधिका-यांकडून वाजविले जात असताना दुसरीकडे डेब्रिजमुळे सावित्रीबाई फुले कलामंदिर ते डोंबिवली अग्नीशामक केंद्र पर्यंतच्या रस्त्याचे विदु्रपीकरण झाले आहे. रस्त्याच्या दुतर्फा डेब्रिज सर्रासपणे टाकले जात असून याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने याठिकाणी ढिग जमा होऊ लागले आहेत. या रस्त्यावर सावित्रीबाई फुले नाटयगृह, बीएसएनएल, पोस्ट आॅफिस, भारतीय जीवन बिमा निगम आणि भारतीय स्टेट बँक आदि महत्वाची कार्यालये आहेत याउपरही या रस्त्याच्या दुतर्फा पडलेल्या डेब्रिजकडे अधिका-यांचे होत असलेल्या दुर्लक्षतेच्या निमित्ताने प्रशासनाच्या निष्क्रिय कारभाराचा नमुना पहावयास मिळत आहे. पेंढरकर महाविद्यालयाच्या मागील रस्ता, अस्तित्व शाळेच्या पाठिमागील रस्ता आणि डोंबिवली अग्नीशामक दलाचे कार्यालय आणि नंदी पॅलेस हॉटेलच्या दरम्यानचा परिसर ही ठिकाण डेब्रिज टाकण्याची हककाची ठिकाण झाली आहेत.