मीरारोड - राज्यात कोरोना संसर्ग रोखण्यासाठी लागू केलेले निर्बंध आणि संचारबंदीमुळे कारणा शिवाय फिरणाऱ्यांची काटेकोर तपासणी मुंबई पोलिसांनी दहिसर सुरू केली आहे. परंतु आधी पासूनच या मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी होत असताना आता तपासणी नाक्यामुळे कोंडीत मोठी वाढ झाली आहे. काशीमीरा महामार्ग आणि रस्ते वाहनांनी जाम झाले असून लोक तासन तास अडकून पडत आहेत. सर्वात गंभीर स्थिती रुग्णवाहिकांची असून कोंडीचा फटका पडून रुग्णांचे हाल होत आहेत.
कोरोनाचा उद्रेक राज्यात झाल्याने संसर्ग रोखण्यासाठी ३० एप्रिलपर्यंत निर्बंध लागू केलेले आहेत. त्या अनुषंगाने मुंबई पोलिसांनी दहिसर चेकनाका येथे विनाकारण फिरणाऱ्या लोकांना आळा घालण्यासाठी तपासणी नाका सुरू केला आहे. येणाऱ्या वाहन व आतील लोकांची चौकशी केली जात आहे. जेणे करून मुंबई अहमदाबाद महामार्गावरील काशीमीरा व सगणाई देवी मंदिरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. चेकनाकाकडे जाणाऱ्या पेणकरपाडा आदी अंतर्गत रस्ते सुद्धा वाहनांच्या कोंडीने जाम झाले आहेत.
वाहन कोंडीत रुग्णवाहिका सुद्धा अडकून पडत आहेत. त्यांना मोकळा मार्ग करून देण्यासाठी काशीमीरा पोलीस व वाहतूक पोलीस आणि वार्डनची मोठी कसरत होत आहे. कारण आधीच वाहनकोंडीत तास न तास लोक अडकून पडले असल्याने कोंडी दूर करण्यासह रुग्णवाहिकांना तातडीने मार्ग मोकळा करून देणे असा दुहेरी ताण यंत्रणेवर पडला आहे . आधीच दहिसर चेकनाका व टोल नाका येथे सकाळी जाताना व सायंकाळी येताना प्रचंड वाहतूक कोंडी असते. रोजचा वाहतूक कोंडीचा त्रास असह्य झाला असताना आता तपासणी नाक्यामुळे त्रासात मोठी भर पडली आहे.