भिवंडी : शहरातील यंत्रमागमालक कमी कामगारांमुळे त्रस्त असताना त्यांच्या असाह्यतेचा फायदा उचलत काही यंत्रमाग कामगार मालकांची चांगलीच फसवणूक करत आहेत. यंत्रमागावर काम करण्याची ग्वाही देत कामगार कारखाना मालकांकडून आगाऊ पैसे घेऊन पळून जात असल्याच्या घटना घडत आहेत. मात्र याबाबत यंत्रमाग मालकांनी पोलिसांकडे धाव न घेतल्याने कामगारांचे चांगलेच फावले आहे.
शहर आणि परिसरांत आठ लाख यंत्रमाग असून त्यावर काम करणारे अनेक कामगार हे उत्तर भारत, दक्षिण भारतातून येतात. मुलांच्या शाळेला सुटी पडल्याने व गावाला लग्नसराई असल्याने अनेक कामगार तेथे गेले आहेत. दरम्यान यार्न मार्केट व कापड मार्केटमधील मंदीच्या कारणाने कसेबसे यंत्रमाग चालवत दिवस ढकलत असताना कामगारांची गरज भासू लागली आहे. तर काही कारखान्यांना टाळे लावण्यासारखी स्थिती झाली आहे. कारखाना बंद पडू नये म्हणून यंत्रमागमालक रात्रंदिवस कामगारांच्या शोधात फिरत आहेत.काही ठिकाणी रोजंदारी कामगारांचे अड्डे सुरू झाले असून त्या ठिकाणाहून जास्त मजुरी देऊन मालक वेळ मारून नेत आहेत. तर आलेला कामगार कोठे जाऊ नये म्हणून त्यास लालसेपोटी आगाऊ रक्कम दिली जाते. त्याचा गैरफायदा घेत रोजंदारीचे कामगार आठवड्याचा पगार आगाऊ घेऊन पळू लागले आहेत. हे कामगार मोबाइल नसल्याचे कारण पुढे करतात. पळून गेल्यानंतर त्यांचा कुठेही पत्ता लागत नाही.कामगारांची नोंद होणे गरजेचेकाही वर्षापूर्वी शहरात आलेला यंत्रमाग कामगाराची नोंद कामगार कार्यालयात करून नंतर त्याने कारखान्यात काम करण्यास जावे. त्यामुळे सरकारी कार्यालयात कामगारांची नोंद होऊन कामगार व यंत्रमाग मालकांनाही सुरक्षा मिळणार होती. हा विषय कामगार संघटनांच्या मागणीवरून राज्य सरकारच्या विचाराधीन होता. परंतु कामगारांना सुविधा नाकारणाऱ्या स्थानिक यंत्रमाग मालकांनी यास विरोध केला. परिणामी कारखाना मालकांना हा त्रास होऊ लागला आहे. कामगार व मालकांतील संबंध सुधारावेत यासाठी या सुविधेचा पुनर्विचार करून सरकारने ही योजना अंमलात आणावी,अशी माहिती टेक्सटाईल मजदूर सभेचे सचिव विजय खाने यांनी दिली.