ठाणे : मागील अर्थसंकल्पात मालमत्ताकरात समाविष्ट असलेल्या विविध लाभकरांमध्ये वाढ केली असताना यंदादेखील त्यात १० टक्के वाढ करण्याचे २०१७-१८ च्या अर्थसंकल्पात प्रशासनाने प्रस्तावित केले आहे. परंतु, आधीच गेल्या वर्षीच्या करवाढीने कंबरडे मोडले असताना आणि पालिकेचे उत्पन्न ३०० कोटींनी वाढले असल्याने आता ठाणेकरांवर कोणत्याही प्रकारची करवाढ करू नये, अशी भूमिका लोकप्रतिनिधींनी घेतली असून यावर ते शनिवारच्या महासभेत शिक्कामोर्तब करणार आहेत. उत्पन्नाचे स्रोत असलेली जकात, त्यानंतर एलबीटीदेखील बंद झाल्याने पालिकेच्या उत्पन्नावर त्याचा परिणाम झाल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी प्रशासनाने मागील वर्षी मालमत्ताकरात समाविष्ट असलेल्या विविध लाभकरांत वाढ करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार, महासभेनेही त्याला मान्यता दिली होती. परंतु, त्यानंतर पालिकेच्या उत्पन्नात सुमारे ३०० कोटींची वाढ झाली आहे. तसेच पालिकेची आर्थिक स्थितीही सुधारलेली आहे. मागील वर्षी मालमत्ताकराचे लक्ष्य ४५६ कोटी इतके होते. परंतु, यंदा ते ४८० कोटी प्रस्तावित केले आहे. ते करताना प्रशासनाने निवासी मालमत्तांच्या जललाभकरात १२ टक्कयांवरून २२ टक्के, बिगर निवासीमध्ये १७ टक्कयांवरून २७, निवासी मालमत्तांच्या निवासी मालमत्तांच्या मलनि:सारण लाभकर ९ टक्कयांवरून १९ टक्के, बिगर निवासीमध्ये १२.५ टक्कयांवरून २२.५, निवासी मालमत्तांचा मलनि:सारणकर ५ टक्कयांवरून १५, बिगर निवासीमध्ये ८ वरून १८, निवासी मालमत्तांच्या रस्ताकरात ६ वरून १० टक्के, बिगर निवासी ९ वरून १० टक्के वाढ प्रस्तावित केली आहे. याशिवाय, इतर काही करांमध्येदेखील वाढ सुचवली आहे.परंतु, मागील वर्षी जी चूक केली, ती आता न करण्याचा लोकप्रतिनिधींचा विचार असून त्यानुसार शनिवारी होणाऱ्या महासभेत कोणत्याही प्रकारच्या करात कोणताही दरवाढ न करण्याचा निर्णय सत्ताधाऱ्यांसह विरोधकांनी घेतला आहे. त्यामुळे शनिवारी होणाऱ्या अर्थसंकल्पाच्या विशेष महासभेत यावर शिक्कामोर्तब होणार असल्याचे बोलले जात आहे. (प्रतिनिधी)
ठाणेकरांवरील करवाढ टळणार
By admin | Published: April 29, 2017 1:35 AM