प्रज्ञा म्हात्रे, ठाणेपाण्याच्या थेंबाथेंबासाठी सर्वत्र संघर्ष सुरू असतानाच ठाणे शहरातील हिरानंदानी इस्टेटमधील ‘हिलग्रेंज’ सोसायटीत मात्र जलश्रीमंत आहे. २००५पासून या सोसायटीने राबवलेल्या विविध उपक्रमांमुळे संपूर्ण महाराष्ट्रात पाण्याची टंचाई असतानाही या सोसायटीत २४ तास पाणी मिळत आहे. यातही सजग नागरिक म्हणून ही सोसायटी या पाण्याचा मर्यादित वापर करीत आहे. बोअरवेल, रेनवॉटर हार्वेस्टिंग, पाणी शुद्धीकरण, एसीमधून पडणाऱ्या पाण्याची बचत यांसारखे अभिनव उपक्रम राबविणारी ही सोसायटी ठाण्यातील इतर सोसायट्यांसाठी प्रेरणादायी आदर्श ठरली आहे. भविष्यात होणारी पाणीटंचाईची दूरदृष्टी ठेवून या सोसायटीने पाणी बचतीचे विविध प्रकल्प राबविले आणि आजच्या भीषण टंचाईत या प्रकल्पांचा फायदा या सोसायटीला होत आहे. घोडबंदर रोड येथे असलेल्या या सोसायटीत २००३ साली ज्यावेळी रहिवाशी राहण्यास आले तेव्हा सुरुवातीला त्यांना पाण्याचा प्रचंड त्रास जाणवू लागला. तब्बल २०० सदनिकांच्या सोसायटीला ठाणे महानगरपालिकेकडून पाणी मिळत होते; परंतु ते मुबलक नव्हते. त्यामुळे सोसायटीने टँकरचे पाणी मागविण्यास सुरुवात केली. तेही पाणी दूषित असल्याने लहान मुले, ज्येष्ठ नागरिकांची तब्बेत बिघडण्यास सुरुवात झाली. यावर पहिला तोडगा म्हणून सोसायटीने २००५ साली बोअरवेल हा प्रकल्प राबविला. त्यानंतर २००७ ते २००९ या तीन वर्षांच्या कालावधीत चार बोअरवेल तयार केले; परंतु या बोअरवेलमधील पाणी पिण्यालायक नसल्याने ते शुद्ध करून प्यावे लागत होते. त्यामुळे रहिवाशांनी विकत पाणी आणण्यास सुरुवात केली. ते फार खर्चीक होऊ लागले. यावरही सोसायटीने अभिनव तोडगा काढला. सोसायटीमध्येच २००९ साली जलशुद्धीकरणाचा प्रकल्प उभारला. दर महिन्याला या प्लाण्टमधील पाणी पिण्यालायक आहे की नाही हे तपासण्यासाठी सरकारमान्य प्रयोगशाळेत त्या पाण्याचा नमुना पाठविला जातो आणि प्रयोगशाळेतून उत्तम पिण्यालायक पाणी असल्याचे प्रमाणपत्रही मिळत असल्याचे सोसायटीचे उपाध्यक्ष सुनील हडकर यांनी सांगितले. पाण्याची समस्या लक्षात घेता रोज गाड्या धुण्याचे प्रमाणही कमी केले.
ठाण्यातील ‘हिलग्रेंज’ जलश्रीमंत!
By admin | Published: April 11, 2016 1:26 AM