ठाणे : हिंद मजदूर सभा या कामगार संघटनेचे महाराष्ट्र राज्याचे तिसावे त्रैवार्षिक अधिवेशन १७ ते १८ डिसेंबरदरम्यान ठाण्यात होणार आहे. केंद्र आणि राज्याच्या कामगारविरोधी धोरणाचा जोरदार विरोध केला जाणार आहे.संजय वढावकर यांच्या नेतृत्वाखालील जनरल मजदूर सभा- ठाणे ही हिंद मजदूर सभेशी संलग्न कामगार संघटना या अधिवेशनाचे आयोजन करणार आहे. गडकरी रंगायतन येथे १७ डिसेंबर रोजी दुपारी ४ वाजता अधिवेशनाचे उद्घाटन होईल. अखिल भारतीय हिंद मजदूर सभेचे अध्यक्ष राजा श्रीधर, सरचिटणीस हरभजनसिंग सिद्धू, मुख्य सल्लागार शरद राव आणि ठाण्याचे महापौर संजय मोरे आदी उपस्थित राहणार आहेत. १८ डिसेंबरला वागळे इस्टेट, सेंट लॉरेन्स स्कूल येथे कामगार प्रतिनिधींचे अधिवेशन होणार आहे. उत्पादनांच्या ठिकाणी कंत्राटी कामगार नसावेत, असा कायदा असूनही कंत्राटी कामगार ठेवले जातात. या धोरणाचाही तीव्र विरोध केला जाणार असल्याची माहिती वढावकर यांनी दिली. हिंद मजदूर सभेचे नेते अॅड. एस. के. शेट्ये, अब्दुल सारंग, जे. आर. भोसले, उपस्थित राहतील. (प्रतिनिधी)
हिंद मजदूर सभेचे अधिवेशन ठाण्यात
By admin | Published: December 17, 2015 12:56 AM