ठाणे : मराठी भावकवितेला इतिहास आहे. हल्ली कविता ही गोष्ट रसिकतेतून उणे झाली आहे. कवितेबाबत आपले मराठी फार तोटके झाले आहे. आपल्याला हिंदी गीते पाठ असतात, परंतु मराठी कविता पाठ नसतात, अशा भावना मनोविकारतज्ज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी यांनी व्यक्त केल्या.
अत्रे कट्ट्यावर बुधवारी डॉ. नाडकर्णी यांची बहुरंगी बुद्धी या विषयावर संपदा वागळे यांनी मुलाखत घेतली. यावेळी नाडकर्णी यांनी त्यांचा जीवनप्रवास उलगडला. कार्यक्रमाचे नेटके आयोजन कसे करता, यावर बोलताना ते म्हणाले की, आयोजन व संयोजनामध्ये महत्त्वाची गोष्ट म्हणजे कार्यक्रम डोळ्यांसमोर घडताना दिसला पाहिजे. जोपर्यंत तो घडताना दिसत नाही, तोपर्यंत कार्यक्रमाचे संयोजन हे कागदावरच दिसते. अथच्या आधी आणि इतिच्यानंतर कार्यक्रम आणला पाहिजे, मग त्या कार्यक्रमातील स्थिर गोष्टी डोळ्यांसमोर आणाव्या. त्यामधील जड आयोजन पूर्ण होते. कार्यक्रमाचा रिअल टाइम आणि इमोशनल टाइम लक्षात ठेवावा. इमोशनल टाइममुळे रिअल टाइम हा कसा गेला, हे कळत नाही. या दोन्ही टाइमची सांगड घालणे आवश्यक आहे. कार्यक्रम डोळ्यांसमोर वारंवार आणावा. यावेळी त्यांनी आपल्याला गाणी कशी सुचतात, याबद्दल सांगितले. हिमयात्रा करताना आलेले अनुभव कथन करताना त्यांनी लिहिलेली ‘प्रिय स्पीती’ ही कविता वाचून दाखवली. त्यानंतर, त्यांच्या अंगी असलेल्या तबलावादनाच्या कौशल्याबद्दल सांगताना भविष्यात नाल, घटम शिकण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली. २७ वर्षे रांगेने आम्ही सगळे डॉक्टर त्यात संगीतकार, गायक आहे, त्यांनी मेडिकल आॅर्केस्ट्रा केला आणि मी निवेदनाची बाजू सांभाळत होतो. त्या ऑर्केस्ट्रामध्ये मराठी भावगीतांचा कार्यक्रम केला. आता सध्या तो कार्यक्रम करत नाही. ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयाजवळ असलेल्या सप्तसोपान डे केअर सेंटरबद्दल सांगताना ते म्हणाले, या ठिकाणी वेगवेगळ्या विषयांवरील प्रशिक्षणाचे कार्यक्रम आयोजित केले जातात. पुढील महिन्यात व्यसनाधीनतेत अडकलेल्या पुरुषांच्या पत्नींसाठी सुरू असलेले सहचरिण किचन येथे स्थलांतरित केले जाणार आहे.