डोंबिवली : शहराच्या पूर्व भागातील तुकारामनगरात राहणाऱ्या १९ वर्षीय मंदार म्हात्रे या हिंदू तरुणाने जैन मुनी, शेकडो जैनबांधव आणि नातेवाइकांच्या साक्षीने जैन धर्मात प्रवेश केला. उर्वरित आयुष्य जैन धर्माच्या प्रचार व प्रसाराकरिता अर्पण करण्याचा निर्धार त्याने केला.मंदार हा मंदार हा सोमवंशी क्षत्रिय पाठारे समाजाचा होता. त्याच्या शेजारी राहणाºया मधुबेन नागडा यांच्या सान्निध्यात तो आला. त्या मंदारला मुलासारखे मानत होत्या. त्यांच्यासोबत तो जैन मंदिरात जाऊ लागला. त्याला जैन धर्म आवडू लागला. त्यामुळे त्याने जैन धर्माची दीक्षा घेण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी आवश्यक असलेले विधी त्याने पार पाडले. शुक्रवारी त्याने विधिवत जैन धर्मात प्रवेश केला. त्याच्या दीक्षा समारंभास त्याच्या आईवडिलांची मान्यता आहे.मंदारवर जैन धर्माच्या प्रार्थनेचा प्रभाव पडला. या संस्कारांमुळे मंदारने जैन धर्माची दीक्षा घेतली. मंदारचे वडील सुहास म्हात्रे यांनी जैन धर्माची दीक्षा घेणे काही सोपे नाही. त्याकरिता अनेक कठीण परीक्षांना सामोरे जावे लागते, असे त्याच्या निदर्शनास आणले. त्यावर मंदारने आपली पूर्ण मानसिक तयारी झाली असल्याचे ठामपणे वडिलांना सांगितले.दीक्षा घेण्यापूर्वी उद्यापन करावे लागते. त्याकरिता, मंदारने तीन हजार किलोमीटर पायी प्रवास केला. या व अशा अन्य परीक्षेत तो यशस्वी झाला. त्यानंतर, त्याला शुक्रवारी जैन धर्मात प्रवेश दिला गेला.याविषयी सुहास म्हात्रे म्हणाले की, मंदारने त्याच्या मनाने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे त्याला आमचा विरोध नाही. त्याच्या आनंदात आम्ही आनंद मानतो. तो चांगले काम करत आहे. त्याला जो धर्म आवडतो, त्याचे आचरण करण्याचे स्वातंत्र्य त्याला आहे. त्याच्या भविष्याच्या दृष्टिकोनातून त्याने हा निर्णय घेतला आहे. तो आम्हाला भेटू शकत नाही. मात्र, आम्ही त्याला नक्कीच भेटू शकतो. कोणत्याही दबावाखाली त्याने हा निर्णय घेतलेला नाही.
हिंदू तरुणाने घेतली जैन धर्माची दीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2018 12:04 AM