ठाणे - आत्मस्तुती आणि आत्मक्लेश यापासून हिंदू समाजाने कटाक्षाने दूर राहिले पाहिजे. टोकाचे कौतुक आणि अकारण निंदा हे हिंदूंनी जाणीवपूर्वक टाळले पाहिजे. हिंदू समाजाचे सबलीकरण हे अन्य सर्वांच्या अस्तित्वासाठी गरजेचे आहे. भारत बहुसंख्य हिंदूंचा असल्याने येथे लोकशाहीचे सशक्तीकरण झाले आहे. हिंदुपण हे सर्वसमावेशक आहे. हिंदूंचे असणे हे लोकशाहीच्या टिकण्याचे प्रमुख लक्षण असल्याचे मत पद्मविभूषण डॉ. अशोक कुकडे यांनी रविवारी दुपारी व्यक्त केले.दीनदयाळ प्रेरणा केंद्र आणि परममित्र पब्लिकेशन्स आयोजित पुस्तक प्रकाशनच्या कार्यक्र मात येथील सहयोग मंदिर सभागृहात ते बोलत होते. रा.स्व. संघाचे ज्येष्ठ प्रचारक रवीकुमार अय्यर यांच्या ‘ग्लिम्पसेस आॅफ हिंदू जिनियस’ या इंग्रजी पुस्तकाचा मराठी अनुवाद ज्येष्ठ पत्रकार अरु ण करमरकर यांनी केला आहे. या पुस्तकाचे प्रकाशन कुकडे यांच्या हस्ते रविवारी झाले. यावेळी व्यासपीठावर मूळ इंग्रजी पुस्तकाचे लेखक रवीकुमार अय्यर, अनुवादक अरु ण करमरकर, दीनदयाळ प्रेरणा केंद्राचे अध्यक्ष भा.वा. दाते, कार्यवाह मकरंद मुळे, परममित्रचे माधव जोशी उपस्थित होते.आपल्या भाषणात डॉ. अशोक कुकडे पुढे म्हणाले, हिंदुपणाची पहाट होत आहे. पण, मोठा पल्ला गाठायचा आहे. भारतातील राजकीय क्षेत्रातील बदल, सत्तेतील बदल ही सुरुवात आहे. रा.स्व. संघाच्या विचारधारेच्या काही पिढ्यांच्या परिश्रमाने, बलिदानाने बदल होत असल्याचेही त्यांनी सांगितले. हा बदल आश्वासक आहे. या बदलाचे आपण साक्षीदार आहोत. पण, वाहकही झाले पाहिजे, असेही त्यांनी स्पष्ट केले. रा.स्व. संघ स्वामी विवेकानंद यांचे कार्य पुढे नेत आहे. काळानुसार बदल झाले. पुढेही आवश्यकतेनुसार होतील. परंतु, शाश्वत मूल्ये, मूळ विचार, व्यापक उद्दिष्ट आणि ते साध्य करण्यासाठी संघटन यात बदल नाही. केवळ विचार उदात्त असून उपयोग नाही. विचार समाजात रुजवता आले पाहिजे. त्या विचारांना समाजाने स्वीकारले पाहिजे. यासाठी संघटनेची आवश्यकता असल्याचेही त्यांनी सांगितले. संघाने माणसे जोडून संघटन विकसित केले आहे. संघटनेच्या आधारे सर्वव्यापी हिंदुपण जतन केले आहे. लोकशाही आणि सहअस्तित्व हे बहुसंख्य हिंदूंंमुळेच टिकून राहिले आहे. हिंदूंचे असणे, हे लोकशाहीच्या टिकण्याचे प्रमुख लक्षण असल्याचेही त्यांनी सांगितले.
आत्मस्तुती आणि आत्मक्लेशापासून हिंदू समाजाने दूर राहावे - डॉ. अशोक कुकडे
By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2019 1:04 AM