लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: मुकेश अंबानी यांच्या अंटालिया इमारतीजवळील स्फोटकांचे प्रकरण आणि ठाण्यातील मनसुख हिरेन यांच्या हत्येचा तपास करणाऱ्या राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) पथकाचे नवीन पोलीस महानिरीक्षक (आयजी) ज्ञानेश कुमार वर्मा यांनी सोमवारी हिरेन यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. तब्बल तीन तासांच्या या भेटीमध्ये हिरेन कुटूंबीयांना आपण न्याय मिळवून देणार असल्याची ग्वाही वर्मा यांनी दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील निवासस्थान असलेल्या इमारतीजवळ जिलेटीनच्या कांडया असलेली मोटार मिळाली होती. याच मोटारीचे मालक मनसुख हिरेन यांचीही हत्या झाली होती. या प्रकरणात निलंबित सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझे, निलंबित पोलीस शिपाई विनायक शिंदे आणि क्रि केट बुकी नरेश गोर यांच्यासह चौघांना अटक केली आहे. तर याच प्रकरणात राज्य सरकारने मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांची उचलबांगडी केली. मनसुख हे ठाण्यातील डॉ. आंबेडकर रोड येथील विकास पाम या सोसायटीत कुटुंबियांसह वास्तव्याला होते. एनआयएचे पोलीस महानिरीक्षक अनिल शुक्ला यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा तपास सुरु होता. मात्र, शुक्ला यांच्या बदलीनंतर त्यांच्या जागी वर्मा यांची नुकतीच नियुक्ती झाली आहे. संपूर्ण देशभर चर्चा झालेल्या या प्रकरणाची माहिती घेण्यासाठी तसेच हिरेन यांच्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी वर्मा हे पोलीस अधीक्षक विक्रम खलाटे यांच्यासह सोमवारी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास ठाण्यातील विकास पाम सोसायटीत दाखल झाले होते. या दरम्यान त्यांनी मनसुख यांची पत्नी विमला आणि भाऊ विनोद हिरेन यांच्याशी चर्चा केली. या दरम्यान, या संपूर्ण प्रकरणातील घटनाक्रमही जाणून घेतला. तसेच विमला यांचा नव्याने जबाबही नोंदवून घेतला.यातील कोणाचीही गय केली जाणार नाही, हिरेन कुटूंबीयांना नक्कीच न्याय मिळवून दिला जाईल, असे आश्वासनही त्यांनी दिले. दरम्यान, या कुटूंबातील एक जेष्ठ व्यक्ती आजारी असल्यामुळे वर्मा यांनी केवळ अनौपचारिक चर्चा करुन माहिती घेतल्याचे हिरेन कुटूंबीयांनी ‘लोकमत’ला सांगितले.