लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया इमारतीजवळ स्फोटके ठेवण्याकरिता ज्या मनसुख हिरेन यांची मोटार वापरण्यात आली, त्या हिरेन यांचा बुडून मृत्यू झाल्याचे शवविच्छेदन अहवालात नमूद करण्यात आले आहे. कालिना येथील न्यायवैद्यक प्रयोगशाळेचा केमिकल अनालायझरचा रिपोर्ट येणे अपेक्षित आहे. मात्र हिरेन यांच्या मृत्यूबाबत उलटसुलट चर्चा सुरूच आहे.
मनसुख यांचा मृतदेह शुक्रवारी सकाळी ११च्या सुमारास मुंब्रा बायपास खाडीजवळ मिळाला. त्यानंतर मुंब्रा पोलिसांनी तो ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविला. शुक्रवारी रात्री ८ ते ९.३० च्या दरम्यान न्यायवैद्यक विभागाचे प्रमुख डॉ. मंगेश घाडगे यांच्या चमूने हे शवविच्छेदन केले. दुसऱ्या दिवशी दुपारी २ वाजेपर्यंत कळवा रुग्णालय प्रशासनाने हिरेन यांच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट केले नाही. त्यानंतर हा अहवाल मुंब्रा पोलिसांकडे सोपविला. अत्यंत संवेदनशील व गुंतागुंतीचा विषय असल्यामुळे या अहवालातील बाबी सांगता येणार नसल्याचे मुंब्रा पोलिसांनी सांगितले. मनसुख यांच्या अंगावर मारहाणीच्या खुणा नसून, किरकोळ खरचटल्याच्या खुणा आहेत. या खुणा मृतदेह खाडीतून बाहेर काढताना झाल्याची शक्यता सूत्रांनी वर्तविली आहे.
अखेर मृतदेह घेतला ताब्यातहिरेन यांचे पुन्हा शवविच्छेदन करावे, असा आग्रह त्यांच्या कुटुंबीयांनी धरला होता. इनकॅमेरा पुन्हा शवविच्छेदन केल्यानंतर तसेच मृत्यूचा अहवाल आल्यानंतरच मनसुख यांचा मृतदेह ताब्यात घेतला जाईल, असा पवित्रा मनसुख कुटुंबीयांनी घेतला होता. मात्र, मृतदेहाची हेळसांड होऊ दिली जाणार नाही व तपासात पारदर्शकता ठेवली जाईल, असे आश्वासन ठाणे पोलिसांनी दिल्यानंतर शनिवारी सायंकाळी मृतदेह ताब्यात घेतला. सायंकाळी ७ वाजता जवाहरबाग स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
या संपूर्ण प्रकरणाचा तपास मुंबई दहशतवादविरोधी पथक करीत आहे. त्यामुळे शवविच्छेदन अहवालात मृत्यूच्या प्राथमिक कारणाचाही अभ्यास सुरू आहे. त्यामुळे आम्हाला त्यावर भाष्य करता येणार नाही.
- लक्ष्मीकांत पाटील, पोलीस उपायुक्त, गुन्हे अन्वेषण विभाग, ठाणे शहर
सीडीआरमधून मृत्यूचे गूढ उलगडणार!मनसुख हिरेन यांच्या संशयास्पद मृत्यूबाबत तपास यंत्रणांच्या हाती अद्याप ठोस माहिती लागलेली नाही. त्यांचा मोबाइलही गायब असल्याने त्याचे सीडीआर काढले जात आहे. दहशतवादविरोधी पथकाने शनिवारी ते ताब्यात घेतले. हिरेन यांना दोन दिवसांपासून आलेले मोबाइल व अखेरचा फोन कोणाचा आला होता, त्यांनी कोणाशी संभाषण केले होते, याचा उलगडा करण्यात येत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
भावासह मित्रांनी व्यक्त केला हत्येचा संशय!मनसुख यांना मारहाण करून त्यांचा मृतदेह पाण्यात टाकला गेल्याची शक्यता मनसुख यांचे भाऊ विनोद हिरेन यांनी व्यक्त केली आहे. त्याचवेळी ते वास्तव्यास असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोडवरील विजय पाम या सोसायटीच्या बाहेर जमा झालेल्या मित्र परिवारानेही त्यांच्या मृत्यूबद्दल शंका उपस्थित केल्या आहेत. सोसायटी तसेच त्यांच्या वंदना सिनेमागृहासमोरील दुकानाच्या बाहेर व कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाबाहेर जमा झालेल्या लोकांमध्येही त्याच्या मृत्यूबद्दल घातपाताचा संशय व्यक्त करण्यात येत होता. मात्र यावर पोलीस अधिकारीही अधिकृतरीत्या काहीच बोलत नाहीत.
सीएचा अहवाल प्रलंबितकळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाने शवविच्छेदनाचा अहवाल दिला आहे. मात्र, मुंबईच्या कालिना येथील न्यायवैद्यक प्रयोगशाळेतून रासायनिक विश्लेषणाचा अहवाल राखीव ठेवण्यात आल्यामुळे मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.
पोलीस छावणीचे स्वरूपमनसुख यांच्या ‘विजय पाम’ या इमारतीच्या बाहेर, छत्रपती शिवाजी रुग्णालयातील न्यायवैद्यक प्रयोगशाळा या सर्व ठिकाणी पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला होता. त्यामुळे या सर्व ठिकाणी पोलीस छावणीचे स्वरूप आले होते.
मृत्यू शुक्रवारी सकाळी ८ वाजतामनसुख यांचा मृत्यू हा १२ तासांपूर्वी झाल्याचेही पीएम अहवालात म्हटले आहे. सायंकाळी ८ वाजता पीएमसाठी मृतदेह घेण्यात आला. त्याआधी १२ तास म्हणजे तो सकाळी ८ ते ९ वाजण्याच्या दरम्यान झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.