कल्याण : एकीकडे केडीएमसी परिक्षेत्रात स्वच्छता मोहिमेला जोमाने प्रारंभ झाला असताना दुसरीकडे मात्र वस्त्यांमधील घाणीच्या बजबजपुरीकडे प्रशासनाचे पुरते दुर्लक्ष झाले आहे. पूर्वेकडील नेतिवली टेकडी प्रभागातील महात्मा फुलेनगरात काही दिवसांपासून हे चित्र दिसते आहे. येथील मैल्याच्या टाक्या तुडुंब भरून वाहू लागल्याने नागरिकांना या घाणेरड्या पाण्यातूनच पायपीट करण्याची वेळ ओढवली आहे. या घाणीच्या बजबजपुरीमुळे परिसरात राहणाऱ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे.नेतिवली टेकडी प्रभागातील महात्मा फुलेनगरमध्ये सध्या मोठ्या प्रमाणावर बेकायदा बांधकामे उभी राहत आहेत. या बांधकामांकडे केडीएमसी प्रशासनाकडून कानाडोळा होत असल्याच्या स्थानिकांच्या तक्रारी आहेत.येथील भागात कचरा आणि तुडुंब भरलेल्या मैल्याच्या टाक्यांकडे मात्र प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. त्यात मैल्याच्या टाक्या भरून वाहत असताना काही ठिकाणी मलवाहिन्या जीर्ण होऊन फुटल्याने त्यातूनही घाणेरडे पाणी सातत्याने बाहेर पडते. याबाबत वारंवार प्रभागक्षेत्र कार्यालयात तक्रारी करूनही त्याकडे दुर्लक्ष होत नसल्याचे नागरिक सांगतात. यासंदर्भात ‘जे’ प्रभागक्षेत्र अधिकारी भागाजी भांगरे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांचा मोबाइल स्वीच आॅफ होता.
‘त्यां’चा प्रवास घाणेरड्या पाण्यातूनच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2018 2:11 AM