ठाणे – शिवसेना आणि ठाणे जिल्हा हे समीकरण जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्येही कायम राहिले असून शिवसेनेच्या झंझावातात ठाण्याच्या जिल्हा परिषदेवर प्रथमच भगवा फडकला आहे. कल्याण, अंबरनाथ, भिवंडी, शहापूर, मुरबाड अशा सर्वच ठिकाणी शिवसेनेने जोरदार मुसंडी मारत जिल्हा परिषदेवर स्पष्ट बहुमत मिळवले.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली, धर्मवीर आनंद दिघे यांच्या पुण्याईमुळे आणि पदाधिकारी व शिवसैनिकांनी केलेल्या अहोरात्र मेहनतीमुळेच यश मिळाल्याची प्रतिक्रिया शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली. शिवसेनेची जिथे जिथे सत्ता आहे, तिथल्या विकास कामांवर उद्धवसाहेब आणि युवा सेनाप्रमुख आदित्यजी ठाकरे यांचे बारीक लक्ष असते. ग्रामीण मतदारांनी दाखवलेल्या विश्वासाला जागत शहराप्रमाणेच ग्रामीण भागाचाही विकास करण्याचे वचन शिवसेना निश्चितपणे पूर्ण करेल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.
पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली श्री. शिंदे यांनी रचलेल्या जबरदस्त व्यूहरचनेमुळे विरोधकांची पुरती कोंडी झाली. श्री. शिंदे आणि शिवसेनेच्या अन्य नेत्यांनी प्रचाराच्या निमित्ताने संपूर्ण जिल्हा पिंजून काढला आणि विकासाच्या नावाने भूलथापा देणाऱ्या विरोधकांना जनतेसमोर उघडे पाडले. त्यामुळेच शिवसेना जे बोलते, ते करून दाखवते यावर विश्वास ठेवत ठाणे जिल्ह्यातील जनतेने शिवसेना उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करत जिल्हा परिषदेवर शिवसेनेचा भगवा फडकावला.
ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्रीही असलेले एकनाथ शिंदे यांनी गेल्या तीन वर्षांमध्ये जिल्ह्यात विकासकामांचा धडाका लावला होता. शहापूर तालुक्यासाठी भावली धरणाची योजना त्यांनी मंजूर करून आणली. अनेक गाव-खेड्यांमध्ये बारमाही टिकणारे रस्ते केले. जिल्हा परिषदेच्या शाळा डिजिटल केल्या. जलयुक्त शिवारच्या माध्यमातून गावागावात शाश्वत पाणीपुरवठ्याची व्यवस्था करून शेतकऱ्यांना भाताबरोबरच रब्बी हंगामात भाजीपाला पिकवण्याची आणि पर्यायाने शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्याची संधी उपलब्ध करून दिली. शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी प्रचारकाळात शिवसेनेने केलेली ही कामे मतदारांपर्यंत पोहोचवण्यात यश मिळवल्यानेच जिल्हा परिषदेवर शिवसेनेचा भगवा डौलाने फडकल्याचे सांगतानाच मतदारांनी दाखवलेल्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही, ठाणे जिल्हा हा देशात पहिल्या क्रमांकाचा जिल्हा बनवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे श्री. शिंदे यांनी सांगितले.